
दैनिक चालु वार्ता औरगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
रिक्षात बसलेल्या मुलीला चालकाकडून अश्लील प्रश्न विचारले जात असल्याने घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची खळबळजनक घटना संभाजीनगर शहरातील सिल्लेखाना ते शिवाजी हायस्कूल रस्त्यावर संकल्प क्लासेससमोर घडली असून यात तरुणीच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तिच्यावर एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवित सय्यद अकबर सय्यद हमीद (३९, रा. प्लॉट नं. १५६, कैसरबाग, पडेगाव) या आरोपीला अटक केली..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकडपुरा परिसरातील 17 वर्षीय तरुणी बारावीत शिक्षण घेते. तिने गोपाल टी भागात खासगी शिकवणी लावलेली आहे. ती दररोज रिक्षाने ये-जा करते. दरम्यान 13 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजता क्लास संपल्यानंतर ती गोपाल टी येथून घराकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. यादरम्यान, आलेल्या एका रिक्षात ती बसली.
विद्यार्थिनी रिक्षात एकटीच बसलेली पाहून चालक अकबर सय्यदने तिला सुरवातीला नाव विचारले. पण या तरुणीने कोणतेही प्रतिसाद न देता त्याला उत्तर दिले नाही. तरीही अकबरने काय करते? असा प्रश्न केल्याने तरुणी सावध झाली. मात्र, काहीसे पुढे गेल्यावर अकबरने हद्द ओलांडली. त्याने तिला थेट फिरायला आवडते का? असा प्रश्न विचारला. तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने विद्यार्थिनीला तुला सेक्स करायला आवडतो का असे म्हणताच घाबरलेल्या मुलीने सिल्लेखाना येथून उजवीकडे वळालेल्या धावत्या रिक्षातून तिने उडी मारली.
त्याचवेळी पाठीमागून वेगात कार आली. मात्र, त्या चालकाने ब्रेक दाबल्यामुळे ती बालंबाल बचावली. ही सर्व घटना येथील सीसीटीव्हीत कैद झाली. परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिला उचलले. तिच्या वडिलांच्या ओळखीच्या व्यक्तीने घरी फोन करून घटना सांगितली. तेव्हा तिचा चुलता, भाऊ यांनी घटनास्थळी धाव घेत तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले.