दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
अनुराधा पौडवाल म्हणजेच लग्नापुर्वीच्या अलका नाडकर्णी दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल हे अनुराधा यांचे पती होते. १९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर मराठी, हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी या सारख्या भाषांमध्ये त्यांनी गाणी गेली. त्यावेळी लता मंगेशकर आघाडीच्या गायिका होत्या पण अनुराधा पौडवाल यांची प्रसिद्धी पाहता त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला गेला. नागीन या चित्रपटात “मे तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा’ हे त्यांनी गायलेलं त्यांच्या आवाजातील गाणं काढून त्याठिकाणी लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं चित्रपटात घेतलं गेलं. त्यामुळे त्या खूप खचून गेल्या होत्या. इतकच नाही तर लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले यांनी एस. डी. बर्मन याच्या स्टुडिओत अनुराधा पौडवाल यांचे पती अरुण पौडवाल यांची सर्वांसमोर इज्जत काढत तिथून निघून जाण्यास सांगितलं होत. पुढे एका दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला तेव्हाही त्या खूप खचून गेल्या होत्या पण टीसिरीजने त्यांना पुन्हा उभं करत भजन गाण्याची संधी दिली. त्यावेळी देखील त्यांचं नाव गुलशन कुमार यांच्या सोबत जोडलं गेलं घाणेरडे आरोपांना त्यांना समोर जावं लागलं.
सामाजिक भान जपणाऱ्या अनेक कलाकार व्यक्ती तुम्हाला परिचयाच्या असतील. अगदी मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, सयाजी शिंदे यांनी देखील ही बांधिलकी जपत सामाजिक कार्यात सहभाग दर्शवला आहे. झाडे वाचवा, झाडे जगवा म्हणत सयाजी शिंदे यांनी गावोगावी वृक्षारोपणाचे काम हाती घेतले तर नाम फाउंडेशनच्या मध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी गावोगावी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यांचे हे कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना परिचयाचे झाले आहे मात्र गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळापासून समाजसेवेचा वसा घेतलेल्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या पाहायला मिळाल्या. या कार्यात कुठल्याही प्रकारे प्रसिद्धी न मिळवता त्या गेल्या चार दशकांहुन अधिक काळापासून समाजसेवेचा वसा नीभावत आहेत. अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या गाण्यांचे असंख्य चाहते आहेत. मात्र या क्षेत्रात कार्यरत असण्यासोबतच त्यांनी ‘सूर्योदय फाउंडेशनच्या’ माध्यमातून देशातील दुष्काळी भागात जलसंधारण प्रकल्प, नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेल्या गावांमध्ये शाळा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी, वैद्यकीय शिबिरे आणि मुंबईतील रुग्णालयांना वैद्यकीय मदत वाटप अशा विविध उपक्रमातून सेवाकार्य केले आहे. ८० च्या दशकात अनुराधा पौडवाल यांनी ‘सूर्योदय फाऊंडेशन’ ची स्थापना केली होती. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनुराधा पौडवाल यांनी मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमधील नवजात शिशु वॉर्डमध्ये वैद्यकीय उपकरणे दान केलेली आहेत. तसेच कूपर हॉस्पिटल, सोनोग्राफी सेंटर, आणि तेथील डॉक्टरांच्या सहकार्याने त्यांनी हृदयाच्या ऑपरेशनसाठी गरिबांना आर्थिक मदत पुरवली आहे. एवढेच नाही तर सामाजिक कार्य हाती घेतलेल्या अनेक छोट्या छोट्या अनाथालय आणि वृध्दाश्रमांना त्यांनी मदत केली आहे.
लायन्स क्लबच्या मदतीने त्यांनी जे जे रुग्णालयाला तब्बल ३६ लाख किंमतीची ऍम्बुलन्स भेट दिली होती. लातूर येथिल हॅप्पी इंडियन व्हिलेज या गावात सेवालाय संस्था आहे. या सेवालयात सुमारे १०० एचआयव्ही ग्रस्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी हे सेवालाय करते आहे. अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या मदत निधीतून या सेवालयाची एक मजली इमारत बांधून दिली आहे. एवढेच नाही तर कोविड काळात देखील त्यांनी आपली ही सेवा अविरतपणे चालूच ठेवली होती. या काळात मोठ्या संख्येने कोविड रूग्णांवर उपचार करणार्या अंतर्गत रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सिलिंडर तसेच व्हेंटिलेटरचा पुरवठा करून देण्यात आला होता. या कामात त्यांची मुलगी कविताचा देखील त्यांना मोठा हातभार मिळतो आहे. अरुण पौडवाल यांच्या निधनापश्चात अनुराधा पौडवाल यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचेही निधन झाले. गायन क्षेत्रात नाव लौकिक मिळवलेल्या ह्या गायिकेची समाजसेवेची बाजू अनेकांना आजही अपरिचित आहे. आपल्या मुलीच्या साथीने त्या ही सेवा अविरतपणे निभावताना दिसत आहेत.
