
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:-संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमी नवी दिल्ली यांच्या कडून नुकतीच संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली.या मध्ये जव्हार तालुक्यातील सुप्रसिध्द तारपा वादक भिकल्या धिंडा यांची निवड झाली असून त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे.संगीत नाटक अकादमीची जनरल कौन्सिल,राष्ट्रीय अकादमी ऑफ म्युझिक डान्स अँड ड्रामा नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत द अशोक नवी दिल्ली नोव्हेंबर २०२२ मध्ये एकमताने एकूण (७५)
कलाकार ज्यांचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांना कोणताही पुरस्कार देण्यात आलेला नाही अश्या परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातून त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सन्मान होणार आहे.देशाच्या अमृत महोत्सवी वर्षी आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत एक वेळचा संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कारासाठी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ निवडलेले पुरस्कार विजेते संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या मध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यामधून अनेक कलावंतांची निवड केली गेली असून यामध्ये पालघर जिल्ह्यातील वळवंडा(जव्हार) येथील सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा ८४ वर्षीय यांची निवड करण्यात आली आहे.संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये व ताम्रपत्र आणि अंगवस्त्रम देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांना वडिलांकडून जन्मापासून ही कला अवगत झाली असून त्यांना तारपा बनवणे व तारपा वाजवणे हा छंद त्यांनी जोपासला असून त्यांच्या तारपाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जवळपास दहा फूट तारपा आहे.भिकल्या धिंडा यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरात सहभागी झाले आहेत.
नुकत्याच १५ नोव्हेंबर रोजी जव्हार येथील राजीव गांधी स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जनजाती विकास मंचाच्या आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी आपली उपस्थिती लावली होती तसेच त्यांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ठ तारपा वादक म्हणून यांची ओळख आहे.त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्य हे आदिवासी संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे तारपा वाद्य वाजवून युवकांना तारपा वाद्य कला जोपासण्यासाठी काम करीत आहेत.ते स्वतः तारपा वाद्य तयार करून विक्री करून स्वतःचा रोजगार निर्माण करीत आहेत.आज पर्यंत त्यांनी आपलं आयुष्य आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी अर्पण केल्याबद्दल त्यांची कला क्षेत्रातील ह्या अमृत पुरस्कारसाठी निवड केली असून त्यांचा हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचे संपूर्ण पालघर जिल्ह्यातुन त्यांच्या अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे .