
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
६५०५.६० हेक्टर क्षेत्र भात लागवडी खाली
जव्हार:-तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भात शेती हे मुख्य पीक असून येथील नागरिक कुटुंबाच्या उपजीविके करिता गरजेपुरता भात ठेवून उरलेला भात विक्री करणे आणि आलेल्या पैशातून आपली दैनंदिन गुजरान करणे असा दिनक्रम चालू असतो.सध्या जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात भात झोडणी अंतिम टप्प्यात असून जनावरांच्या चाऱ्याकरिता उरलेला पेंढा पावसाळ्यासाठी जमा करून ठेवला जात आहे.
जव्हार तालुक्यात सुमारे ६५०५.६० हेक्टर क्षेत्रामध्ये भात पिकांची लागवड करण्यात आली असून गावा-गावात भात पीक चांगले आले असल्याने ठिकठिकाणी भात झोडणीचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.ज्या शेतकऱ्यांची झोडणी पूर्ण झाली आहे अश्या शेतकऱ्यांनी पेंढा रचून ठेवायला सुरुवात केली आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि मजुरांची कमतरता यामुळे पूर्वीच्या तुलनेत शेतीचे क्षेत्र कमी होत गेल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यंदा भात झोडणीतून आलेल्या पेंढा पुढच्या पावसापर्यंत गुरांना चाऱ्यासाठी,फळे पिकविण्यासाठी चांगल्या रीतीने साठवणूक करता याव्या यासाठी तो पेंढा व्यवस्थित साठवून ठेवण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.भात झोडणी झाल्यानंतर उरलेला पेंढा काही प्रमाणात विक्री करून तो साठवून ठेवणे आणि त्या पेंढ्याची पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून योग्य पद्धतीने घरामध्ये एका कोपऱ्यात सुरक्षित ठेवला जातो.खळ्यावरची भाताची उडवी म्हणजे खळ्याची शोभा मानली जाते मात्र आज शेतीची संकल्पना बदलली आहे.शेतीचे क्षेत्रही दिवसागणिक कमी होत असून गोठ्यातला गुराचा आवाज देखील कमी झाल्याचे दिसून येत आहे.जशी शेतात राबणाऱ्या माणसांचे हात कमी झाले तसेच ढवळ्या-पवळ्याची भ्रमंतीही विरळ झाली.अशा स्थितीतही गावखेड्यांमध्ये स्वतः पुरत का होईना शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.
यंदा भात कापणीला लांबलेल्या पावसामुळे उशिरा सुरुवात झाली मात्र पावसाचा हंगाम लांबला तरी पिकाला चांगला फायदा झाला.कोणत्याही प्रकारे रोगाचा विशेष प्रादुर्भाव झाला नसल्याने भात पीक चांगले आले आहे.
वसंत नागरे,तालुका कृषी अधिकारी,जव्हार