
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भू म:- तालुक्याचे ग्रामदैवत श्री क्षेत्र आलमप्रभू देवस्थान यात्रेस प्रारंभ होत असून,मागील दोन वर्षांपासून कोरोना या रोगामुळे यात्रा मोठया प्रमाणात साजरी केली नाही.या वर्षी निर्बंधमुक्त असल्यामुळे मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनही सज्ज झाले आहे.या यात्रेत धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यात्रेनिमित्त १० डिसेंबर रोजी सायंकाळी पेठ विभागातील दत्त मंदिरपासून पालिका चौकापर्यंत श्रींची रथामधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर शोभेचे दारूकाम व गुरुदेव दत्त हायस्कूलच्या प्रांगणात आळंदी येथील हभप उत्रेश्वर महाराज कोल्हारवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे.
११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता गरुडदेवाची कसबा भागातून मिरवणूक होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता श्रींची काळविटावरून मिरवणूक, गांधी चौकात मल्लखांब, काठी फिरवणे, कवायत प्रकार व शोभेचे दारूकाम होणार आहे. यानंतर गुरुदेव दत्त हायस्कूलच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१२ डिसेंबर रोजी पहाटे श्रींची गरुड देवावरून स्थामधून मिरवणूक काढण्यात येईल. यानंतर दुपारी १२ वाजता आलमप्रभू देवस्थान परिसरात महाप्रसाद, दुपारी २ ते ५ या वेळेत देवस्थानच्या पायथ्याशी आसलेल्या मैदानावर जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. या दिवशी सायंकाळी ६ वाजता श्रींची सिंहावरून मिरवणूक होऊन यानंतर शोभेचे दारुकाम होणार आहे. तर रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.समाजप्रबोधनपर कीर्तन होणार आहे. १३ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता श्रींची सिंहावरून मिरवणूक, आरती होऊन यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेसाठी विश्वस्त मंडळ, पुजारी मंडळ नागरिक परिश्रम घेत आहेत.