
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : पूर्णा तालुक्यातील एकूण १३ पैकी मुंबर व गोविंदपूर या २ ग्रा.पं. बिनविरोध आल्या आहेत. तर उर्वरित ११ ग्रा.पं.मध्ये निवडणूक पार पाडली जाणार आहे.
परभणी जिल्हा व पूर्णा तालुक्यातील एकूण १३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या रणसंग्रामाला जोमाने सुरुवात झाली असून राजकीय धुरळा उडायला काल पासून सुरुवात झाली आहे. दरम्यान मुंबर व गोविंदपूर या दोन गावांतील नागरिकांनी समन्वय व सामंजस्य राखत जो उमेदवार काम करु शकेल, त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करीत बिनविरोध निवडून देणेच पसंत केले आहे. त्यामुळे एकमेकांमध्ये निर्माण होणारी धुसफूस तर टळलीच शिवाय खर्चही वाचला गेला ही बाब सौर्हादपूर्वक अशीच म्हटली पाहिजे.
दरम्यान ज्या ग्रा.पं. घ्या निवडणूका घेतल्या जाणार आहेत, त्यात गौर, कानडखेड, सोनखेड, निळा, चुडावा, पिंपरा, दगडगाव, रुकला यासह आदी गावांमध्ये निवडणूक होणार असून प्रचाराची रणधुमाळी जोमाने सुरु आहे.
बोचऱ्या थंडीत सर्वच उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवणे सुरु केली आहे. अनेक राजकीय मान्यवरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान होऊ घातलेल्या या सर्वच निवडणूक प्रचारावेळी कोणतेही हेवेदावे किंवा वातावरण कलुषित होईल ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली जाईल अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. केवळ नि केवळ वैचारिक मतभेद असले पाहिजेत. जो उमेदवार विजयी होईल त्याविरोधात कोणताही आकष मनात न बाळगता सामंजस्य राखले गेले पाहिजे असेही पोलिसांनी सांगितले असून कोणत्याही ग्रा. पं. क्षेत्रात विजयी मिरवणूका काढल्या जाणार नाहीत, असे सक्तीचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.