
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या असून चिन्ह वाटपापर्यंतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतरच्या स्पष्ट चित्रानंतर इठलापूर (दे) व साठला या दोन संपूर्ण ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत. उर्वरित २७ ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणुकीचा रणसंग्राम रंगला जाणार आहे.
बोचऱ्या थंडीतही सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. या निवडणूकी लहान असल्या तरी अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण बऱ्याच ग्रामपंचायत क्षेत्रात गटबाजीला पूरते उधाण आल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. दरम्यान परभणी तहसीलदार कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार या निवडणुकीत २९ जागा बिनविरोध आल्या असून त्यापैकी ३ सरपंच आणि २६ सदस्यांचा त्यात समावेश आहे.
तालुक्यातील ज्या २७ गावांतील ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्षात सार्वजनिक मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्यात नांदेडला, सनपूरी, मिरखेल, बाभळी, झाडगाव, पात्रा, रायपूर, सायाळा, खटींग, कारेगाव, आसोला, मठकऱ्हाळा, पारवा, कौडगाव, बाभूळगाव, शहापूर, पिंपळगाव, शेंद्रा, पिंगळी, साडेगाव, वाडी दही, पेडगाव, धसाडी, साळापूरी, हसनापूर/तुळजापूर, टाकळी कुंभकर्ण, पिंपरी देशमुख, तट्टू जवळा या गावांचा समावेश आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचांच्या नांदखेडा, इठलापूर, साठला या तीन गावांचा तर २६ सदस्यांचा समावेश विविध ठिकाणी असल्याचे समजते आहे.