
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
कोट्यवधी रुपये खर्च करून आणि वेगवेगळ्या योजनांची घोषणा करूनही हजारो बालके कुपोषणाच्या फेऱ्यात अडकली असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला शून्य कुपोषणाचा स्तर गाठता आलेला नाही. धक्कादायक म्हणजे नुकत्याच झालेल्या तपासणीत जिल्ह्यात तब्बल साडेसात हजारांवर बालके कुपोषणाच्या फेऱ्यात अडकल्याचे दिसून आले आहे.
बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठा केल्या जातो तसेच अंगणवाडीत दर महिन्याला या बालकांची वजन व उंचीची नोंद घेत, त्यांच्या वाढीवर देखरेख ठेवली जाते. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील राबवल्या जातात. ज्यात बालकांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे याबाबत सर्व माहिती पोषण ट्रॅकर अॅपद्वारे प्रशासन आणि शासनापर्यंत पोहचवली जाते. मात्र असे असतांना देखील एका तपासणीत जिल्ह्यात तब्बल साडेसात हजारांवर बालके कुपोषणाच्या फेऱ्यात अडकल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
17 ते 30 नोव्हेंबरदरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. या मोहीमेसाठी 305 पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने वेगवेगळ्या अंगणवाडीला भेटी दिल्या. या भेटीदरम्यान पोषण आहारसोबतच बालकांची तपासणी करण्यात आली. ज्यात त्यांच्या वजन व उंचीच्या नोंदीही घेण्यात आल्या होत्या. या मोहिमेनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात गंभीरपणे तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 1202 बालके, तर मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 6416 बालके आढळून आली आहेत.