
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : परभणी शहर आणि लगतच्या परिसरातील होणारे भयानक अपघात टाळता यावेत यासाठी ‘स्पीड गन’ ची नितांत आवश्यकता आहे. ही प्रणाली अंमलात आणली गेली तर खरोखरच कित्येकांचे प्राण वाचले जातील असे सुतोवाच ज्येष्ठ समाजसेवक तथा ‘चालू वार्ता’ या मराठी दैनिकाचे परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांनी केले आहे.
परभणी शहर व परिसरात मागील कित्येक महिन्यांपासून असंख्य अपघात होत आहेत. ज्यामुळे कित्येकांच्या जीवावर बेतले जाऊन त्यात त्यांचे प्राणही गेले आहेत. त्यांच्या जाण्यामुळे कित्येक आया-बहिणींना वैधव्य आले आहे. अशा प्रकारांमुळे कित्येक घरांवर शोककळा पसरली जाऊन संसार उध्वस्त झाले आहेत. कोणतेही नियंत्रण न ठेवता भरधाव वेगाने अशा प्रकारे भयान अवस्थेत वाहने चालवून केलेली चूक किती महागात पडू शकते, याच्या उदाहरणादाखल असंख्य घटना परभणी शहर व परिसरात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण न ठेवता भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांची संख्या शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. अशा अपघातांमध्ये कित्येक शाळकरी मुले-मुली, तरुण-तरुणी, महिला-पुरुष, वयोवृध्दांचा आणि ज्यांच्या शिरावर घर प्रपंचाची जबाबदारी आहे, अशा कित्येकांचा त्या अपघातात कोणाचा जागेवरच तर कोणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोणाच्या चुकीचं प्रायश्चित्त कोणाला भोगावं लागलं आहे आणि नव्हे आजही कित्येक जणांना भोगावं लागत असावं यात तसूभरही शंका नाही.
परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. आणि वाहतूक खात्याला विनम्र प्रार्थना आहे की, अशा प्रकारच्या भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर खरोखरच आळा बसला जावा असे वाटत असेल आणि त्यात कोणाचाही अपघात घडू नये, त्यांच्यावर गतप्राण होण्याची पाळी येऊ नये वाटत असेल तर ‘स्पीड गन’ ची ही प्रणाली नक्कीच वापरात आणली जाणे गरजेची आहे. तसे झाले तर कित्येकांचे जीव वाचले जातील. आया-बहिणींवर येऊ पहाणारे वैधव्य टळू शकेल. उध्वस्त होणारे संसार सुखरुप राहिले जातील. परिणामी घरांवर येणारी संकटंही टळली जातील. इतकेच नाही तर समस्त आया-बहिणींचे, त्या त्या परिवारांचे आशीर्वाद सुध्दा परभणी पोलीस विभागाला लागल्याशिवाय निश्चितच राहाणार नाहीत.
‘स्पीड गन’ ही नियमावली व कार्यप्रणाली अंमलात आणण्यासाठी पोलिसांना कमालिचा कटाक्ष बाळगावा लागणार आहे, यात शंकाच नाही. आवश्यकता भासल्यास कायदा व नियमांना तिलांजली देऊ पहाणाऱ्या अशा महाठगांवर जबरी दंडात्मक कारवाई आणि कठोर कायद्याचा इंगा दाखवला जाणे आवश्यक ठरणार आहे. जे जे करणे आवश्यक आहे, असे सर्व काही केले तरी चालू शकेल परंतु वाहनांच्या भरधाव वेगाला आळा हा बसलाच पाहिजे एवढे निक्षून सांगावेसे वाटते. कोणताही कायदा किंवा प्रणाली मुर्त स्वरुपात आणायची म्हटलं तर त्रास हा होतच असतो शिवाय अधिकारी वर्गाला सुध्दा ते कष्टप्राय असेच ठरले जाते परंतु केवळ जिल्हा, राज्य नव्हे तर देशात सर्वप्रथम अंमल करणारा जिल्हा म्हणून परभणीचे पर्यायाने आपले सुध्दा नाव ‘रोषण’ होणार आहे असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही.
नववर्षाच्या प्रारंभीच म्हणजेच आज १ जानेवारी २०२३ पासून ‘स्पीड गन’ चा हा प्रयोग समृध्दी महामार्गावर अंमलात आणला जाणार आहे. त्यामुळे या महामार्गावरील भरधाव धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर आपोआपच नियंत्रण येणार आहे. ज्यामुळे वाहतूक तर सुरळीत चालली जाणार आहेच शिवाय संभाव्य अपघातांनाही आळा बसला जाणार आहे. केंद्र सरकार व परिवहन खात्याच्या पुढाकाराने अंमलात आणली जाणारी ही प्रणाली नक्कीच यशस्वी ठरली जाणार आहे. यात विश्वास बाळगायला मुळीच हरकत नसावी.