
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:-छत्रपती शिक्षण मंडळ,श्री जयेश्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट हायस्कूल येथे सालाबाद प्रमाणे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या उपस्थितीत व शाळेचे मुख्याध्यापक नरेश मराड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडले.या पारितोषिक वितरण सोहळ्यात शाळेच्या शिक्षकांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून शाळेची गुणवत्ता सर्वांसमोर मांडण्यात आली.तसेच निवडक माजी विद्यार्थ्यांच्या देखील यावेळी सत्कार करून वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
तर मागील २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे देखील सत्कार करण्यात आला.३० व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत या हायस्कूलने भाग घेऊन ‘नाचणी पिकाचे पौष्टिक अन्नधान्य म्हणून अभ्यास’ या विषयावर राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे व शालेय व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले.या सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी जव्हार पंचायत समितीचे उपअभियंता विष्णू बोरसे,ग्रामपंचायत डेंगाचीमेटचे सरपंच कमळाकर धूम,शिरोशीचे सरपंच योगिता शेंडे,ग्रामपंचायत सदस्य,माजी विद्यार्थी,पालक वर्ग व विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.