
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील साने गुरुजी विद्यालयात साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षकांचा गुरु गौरव सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव होते. तर पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच बंडोपंत ढाकणे, माजी सरपंच बालाजी ढाकणे, आर.सी पाटील, दिपकराव जाधव, भारत कांबळे, जब्बार पठाण,सरपंच कौंटबे आदी मान्यवर उपस्थित होते.
साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये केंद्र प्रमुख बालाजीराव शिंदे,केशव काचे ,चंद्रशेखर मोरे ,उमाकांत पाचंगे, भीमराव कदम, बाबासाहेब वाघमारे मुरहारी कराड ,गिरीश माने, अर्चना पडूळ ,विवेकानंद मठपती,धनाजी सूर्यवंशी,शंकरराव कदम केंद्रप्रमुख, धनंजय उजनकर व महादेव खलुरे आदी शिक्षकांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीपराव देशमुख यांनी उपक्रमशील मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्या कार्याचा गौरव करून साने गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या विद्यालयाची वाटचाल सुरू असून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये आई-वडिलांची सेवा करण्याचा अनमोल सल्ला दिला, शाळेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये शाळेने केलेल्या शैक्षणिक, क्रीडा सांस्कृतिक, सामाजिक वैज्ञानिक व राजकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नावलौकिकाचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाडीकर मॅडम यांनी, प्रास्ताविक शाळेतील सहशिक्षक सूर्यवंशी सर यांनी केले तर आभार तुमराम सर यांनी मानले.