
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गंगा आणि गोदावरी चे विशेष महत्त्व आहे. गंगेला भूतलावर आणणारे दोन महान तपस्वी आहेत. असे संदर्भ पुराणात सापडतात. भगीरथाने गंगेला पृथ्वीतलावर आणले जिचा उगम हिमालयात कैलास पर्वतावर गंगोत्री येथे होतो तर गौतमी ऋषीने गंगा नदीला ब्रह्मगिरी पर्वतावर आणले किंवा आपल्या तपोबलाने प्रगट केले ती गोदावरी नदी होय. तिला गौतमी गंगा किंवा गंगा गोदावरी असेही नाव आहे. महाराष्ट्रात गोदावरी नदीचे विशेष महात्म्य आहे . गोदाकाठावर अनेक तीर्थस्थान असून गोदावरी नदी ही महाराष्ट्राच्या भूभागातील वरदायिनी नदी आहे .भारतीय संस्कृती आणि परंपरेची वाहक आहे. गोदाकाठावरील परिसरात समृद्ध परंपरेचा वारसा पाहायला मिळतो.भारतीय संस्कृतीमधे गंगा आणि गोदावरी नदी आरोग्यदायिनी, मोक्षदायिनी ,सर्व पातकनाशींनी आणि जीवनदायिनी अशी अनेक दृष्टीने लोकमानसात मान्यता पावलेली असून भाविक भक्तांसाठी विशेष श्रद्धास्थान आहे.
गंगा गोदा नदी जेथे समुद्रात मिळतात ते स्थळ म्हणजे गंगासागर होय. संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर गंगासागर येथे जाऊन शाही स्नान भाविक भक्त करतात .पण ज्यांना शक्य नाही ते जिथे गंगा किंवा गोदावरी असेल तेथे शाही स्नान करण्याचा लाभ घेतात. गोदाचे विशेष महत्त्व म्हणजे ब्रह्मपुराणात आणि शिवपुराणात आलेल्या वर्णनाप्रमाणे सिंह राशि गुरु ग्रह असताना सिंहस्थ पर्वणी येते व ही पर्वणी गौतमी गंगा जेथे दक्षिण वाहिनी असते तेथे गोदास्नान करून पुण्यप्राप्ती करावी असे संकेत आहेत.अशी पावन भूमी म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक.येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. यानंतर परभणी जिल्ह्यातील धारासुर या गावी सुद्धा गोदावरीचा काही भाग दक्षिण वाहिनी आहे म्हणून या स्थानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे.हे क्षेत्र सुद्धा तितकेच पावन आहे.ज्यांना गंगासागर ला जाऊन स्नान करणे शक्य नाही ते नाशिकला शाही स्नान करतात ज्यांना तेही शक्य नाही त्यांच्यासाठी दक्षिण वाहिनी गोदा वाहत असलेले ठिकाण म्हणजे धारासुर हे परम पवित्र क्षेत्र आहे .पण ज्यांना येथेही जाणे शक्य नाही त्यांनी कुठेही जेथे गोदा नदी वाहत असेल त्या ठिकाणी गोदावरी* नदीमध्ये जाऊन स्नान करावे. पुरानात आलेल्या वर्णनाप्रमाणे याला धार्मिक महत्त्व आहे. गोदा मधे स्नान करत असताना मानवी मनात सकारात्मक भाव असतो. “गोदा गंगा पाप विनाशिनी आहे आणि माझे पाप स्नान करत असताना नष्ट होत आहेत.”परिणामी मनातील स्पंदने अधिक सकारात्मक होऊन प्रवाहित होतात. प्राचीन ऋषीमुनींनी अशा अनेक सूक्ष्मते सूक्ष्म पैलूंचा अभ्यास केला आहे. भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. ज्या मागे एक शास्त्र असून मानवी कल्याणाचा विचार केलेला आहे. मनात भावना ,श्रद्धा आणि भक्ती असेल तरच त्या सूक्ष्म पैलूंचा उलगडा व्हायला लागतो.
सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार असे संकेत आहेत. तथापि ज्यांना गंगासागर ला जाणे शक्य नाही किंवा नाशिकला जाणे शक्य नाही.त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था आहेत. धारासूर या गावातील दक्षिण वाहिनी गोदा हे पंचक्रोशीतील भाविकभक्तां शिवाय सर्व दूर महाराष्ट्रासाठीच विशेष श्रद्धास्थान आहे.
प्रा डॉ सिमा बाबाराव नानवटे डोल्हारे