दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी -वसंत खडसे
👉 आर्थिदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थी
विद्यार्थ्यांचा टाहो..
👉 सबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अधांतरी..

वाशिम : डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना ही बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील म्हणजे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, नोंदणकृत मजूर आदी आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थी जे पुढे जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील केवळ पैशाअभावी त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अधुरे राहणार नाही. या उदात्त हेतूने सदर योजना सुरू करण्यात आली असून, आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या दुर्बल घटकातील कोणीही उच्च शिक्षणापासून वंचीत राहू नये हेच या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. तथापि गेल्या दोन वर्षांपासून सदर शिष्यवृत्तीची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्यामुळे, डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचा लाभ कधी मिळणार..? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री महोदयांनी या ज्वलंत समस्याकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी वजा विनंती वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी दै. चालु वार्ताला दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
सदर शिष्यवृत्ती योजनेतून वसतिगृह निर्वाह भत्ता हा आशा विद्यार्थ्यांना देण्यात येतो की, जे बिगर आरक्षित प्रवर्गातील म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतांना सबंधित महाविद्यालयात असलेल्या वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. असे विद्यार्थी शहरात कुठेतरी जागा भाड्याने घेऊन राहतात. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा,कुणबी समाजातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमुजर, ई. नोंदणीकृत मजूर, की ज्यांना मुंबई, नागपूर,पुणे, औरंगाबाद सारख्या महानगरात जागा भाड्याने घेऊन शिक्षण घेणे झेपावत नाही. अशा विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये प्रमाणे प्रतिवर्ष दहा महिन्याचे ऐकून तीस हजार रुपयाची मदत शासन डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजनेतून देण्यात येते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून सदर शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्यामुळे आथिर्क परिस्थितीने दुर्बल असलेल्या पालकांचा जीव टांगणीला लागला असून उच्च शिक्षण पूर्ण करून भविष्यात प्रगती करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गरीब, होतकरू, गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर केवळ आर्थिक अडचणीपोटी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची खंत पालक व्यक्त करीत आहेत.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात असेही नमूद केले आहे की, सदर शिष्यवृत्ती साठी लागणारे कागदपत्र व अर्ज भरून महाविद्यालया मार्फत सबंधित विभागाकडे सादर केली आहेत. तथापि या गंभीर बाबीकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. परिणामी शैक्षणिक खर्च आवाक्या बाहेर चालला असून पालकांची आर्थिक फजिती होत आहे. या गंभीर समस्येकडे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी कळकळीची मागणी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
