दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आर्थिक समस्या, कौटुंबिक बिकट परिस्थिती या मर्मावर बोट ठेवत आजघडीला आर्थिक देवाण घेवाण करणाऱ्या असंख्य फायनान्स कंपन्या मोठ्या प्रमाणात बाजारात उतरल्या आहेत. अनेकांकडे तर फायनान्स चालवण्याचा परवाना नसल्याचे दिसून येत आहे. तरी देखील गरजू लघु व्यावसायिक, मजूर, शेतकरी, कामगार यांना गळाला लावून त्यांच्याकडून सक्तीने पैसे वसूल केले जात आहेत. त्यातून अनेक जण वेळेत पैसे भरू शकत नाहीत त्यांना संबंधित फायनान्स कंपन्याच्या कर्मचाऱ्याकरवी दमदाटी करण्यात येते. परिणामी भीती पोटी अनेकांना जीवाला मुकावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. लोहा शहरातील एका छत्तीस वर्षीय तरुण सुवर्ण कारागिराने एका फायनान्स कंपनी कडून कांहीं रक्कम कर्जव्याजाने घेतली होती. सदर रक्कम वेळेवर दिली नसल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्याने अरेरावी करत दम भरल्याने सदरील कारागिराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. सदर घटने प्रकरणी लोहा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केवळ फायनान्स कंपनीचा तगादा व जबरदस्ती मुळे तरुण कारागिराचा जीव गेल्याने त्यांच्या लहान चील्यापिल्यांचा संसार उघड्यावर पडला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सध्याची महागाई त्यात हाताला काम नाही आणि कुटुंबातील गरजा पाहता सर्वसामान्य गरीब कुटुंब आर्थिक संकटात सापडले असल्याचे दिसून येत आहे. नेमके याच बाबींचा फायदा उठवत कांहीं आर्थिक दृष्टया गब्बर मंडळी अर्थकारणात उतरली आहेत. विशेष म्हणजे या मंडळींचा डोळा हा सर्वसामान्य गोरगरीब, मजूर, कष्टकरी, कामगार, छोटा शेतकरी, लघु व्यावसायिक यांच्या वस्तीकडे असल्याचे आढळून येते. सर्वसामान्य गरीब नागरिकांना वेगवेगळ्या नावाने बाजारात उतरलेल्या वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या ह्या कांहीं महिलांचा बचत गट तयार करण्यास सांगून त्यांना एकगठ्ठा रक्कम वितरीत करतात. मग सदरील रक्कम बचत गटातील महिला वाटून घेतात. आणि रक्कमेचा परतावा हा दर आठवड्याला हप्ता स्वरूपात भरणा करतात. ज्यांना घेतलेली रक्कम वेळेत भरणा करता आली नाही त्यांना त्याच बचत गटातील इतर महीलांकरवी दबाव टाकण्यात येतो. त्यानंतर बचत गटांना वित्त पुरवठा करणारे कर्मचारी त्यांच्या पद्धतीने दबाव टाकून त्याची अब्रू काढतात. तसे अधिकारच सदर कर्मचाऱ्यांना त्यांच्या फायनान्स कंपीनी कडून बहाल करण्यात आल्याचे समजते.
मूळ पेठ पिंपळगाव ता. पालम जि. परभणी येथील देवानंद भारत काटकर (वय ३६) हे मागील पाच वर्षापासून लोहा शहरातील सायाळ रोड परिसरात वास्तव्यास आहेत. देवानंद हे उत्तम सुवर्ण कारागीर असल्याने लोहा शहरातीलच सराफा बाजारातील एका दुकानात कारागीर म्हणून काम करत होते. त्यांनी घरातील वाढत्या गरजा करिता महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. प्रारंभी कर्जाचे हप्ते वेळेवर भरणा केले मात्र तदनंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांनी भरणा बंद केल्याचे समजते. मध्यंतरात देवानंद काटकर हे आर्थिक जुळवणी करण्यासाठी बाहेर गावी गेले. कांहीं रक्कम कंपनी कडे जमाही केली. परंतु इतर उर्वरित रक्कम भरणा करण्यास थोडासा अवधी मागितला असता एकतर पूर्ण कर्जाच्या रक्कमेचा भरणा कर नाहीतर तुझे मृत्युपत्र दे अशी मागणी देवानंद यांना कंपनी कर्मचाऱ्यांनी केल्याचे मयत देवानंद यांचे भाऊ गजानन काटकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तसेच सदर कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचाऱ्यांनी देवानंद यांना मोटारसायकल वर बसवून घेवून गेले आणि एक कर्मचारी गटातील महिलांना घेवून देवानंद यांच्या पत्नीस ओलीस ठेवले. कांहीं तासांनी कर्मचाऱ्यांनी देवानंद यांना घरी आणले असता देवानंद हे बेशुद्ध पडल्याने त्याच कर्मचाऱ्यांनी देवानंद यांना दि. १२ रोजी सायंकाळी लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र उपचारापूर्वीच देवानंद काटकर हे मयत झाले होते. शवविचछेदनानंतर प्रेत काटकर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मयत देवानंद यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
याप्रकरणी लोहा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोउपनि रेखा काळे या करीत आहेत.
सदर प्रकरणी तपास सुरू असून शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– संतोष तांबे (पोलिस निरीक्षक) पोलिस ठाणे लोहा
रविवारी आमच्या फायनान्स कंपनी चे कार्यालयीन कामकाज सुरू नव्हते. परंतु महिला बचत गटांच्या महिलांच्या विनंती वरून आमचे कांहीं कर्मचारी कर्तव्यावर असल्याचे समजले. सदर प्रकार चुकीचाच होता. मात्र सदरील प्रकरणी अधिकृत माहिती घेवून बोलणे उचित ठरेल.
– मारोती खोसडे (युनिट मॅनेजर) भारत फायनान्स कंपनी लोहा
