
दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर-मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर शहरातून मोठी बातमी समोर येत असून, ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली असल्याचे समोर आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. तर आज सकाळीच ईडीने शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिसात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर ई निविदा प्रकरणात अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तसेच महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा या सर्वांवर आरोप आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात आता ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण!
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. दरम्यान यावेळी 40 हजार घरांसाठी चार हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत ही निविदा काढण्यात आली होती. यावेळी रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांनी देखील निविदा भरली होती. मात्र यावेळी भरण्यात आलेल्या निविदा एकाच आयपीवरुन भरली असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अटींचा भंग केल्याप्रकरणी यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती.