
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात शेनओहळ नदीवर बांधण्यात आलेल्या वाकद संग्राह लघु प्रकल्पात एकलासपुर , शेलुखडसे येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्या आहेत.तथापि, प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अंतिम टोकावर शेलुखडसे येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी असून सदर जमिनी नदीच्या दुतर्फा आहेत. पावसाळ्यात प्रकल्प तुडूंब भरला असता, सबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा वहीवाटीचा रस्ता संपूर्णतः पाण्यात बुडालेला असतो. परिणामी पैलतीरावर असलेल्या शेताची मशागत, पेरणीसाठी लागणारे साहित्य ने_आण करणे दुरापास्त झाले असून, हंगामात आपला शेतमाल घरी आणण्यासाठी सबंधित शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे. या गंभीर समस्येमुळे आपले शेतीविषयक कामे करण्यासाठी व शेतमाल घरी आणण्यासाठी तात्पुरता साकव सदृश पुल तयार करून तारेवरची कसरत करावी लागत आहे. या बाबत अनेक वेळा लघु पाटबंधारे विभाग क्रमांक ३ वाशिम यांच्याकडे तोंडी व लेखी स्वरूपात विनंतीअर्ज केले आहेत परंतु सबंधित विभागाने आमच्या विनंती अर्जाला केराची टोपली दाखवली आहे. शिवाय लोकप्रतिनिधी म्हणून रिसोडचे विद्यमान आमदार, खासदार यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करून विनंती केली आहे. तथापि आमच्या गंभीर समस्येची अद्याप पर्यंत कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे सदर पाण्यात ” रस्ता नव्हे; आमचं नशीबच बुडाले ” अशी उपहासात्मक खंत समस्याग्रस्त शेतकरी तथा शेलुखडसे येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते विश्वासराव कोंडबा खडसे ( पाटील ) यांनी दै. चालु वार्ताच्या प्रतिनिधी बोलतांना व्यक्त केली.
सत्ताधारी व सत्तेत येण्यासाठी धडपडणारे तथाकथित शेतकरी नेते यांना निवडणूक काळात एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका येतो. हे सर्वश्रुत आहेच, परंतु हा केवळ ” आभास ” असल्याचे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लक्षात येतं आहे. शेतकऱ्यांना आपलं सर्वस्व, दैवत मानणारे नेते निवडणूक काळ संपला की शेतकऱ्यांकडे व त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे सपशेल पाठ फिरवतात हेच शेलुखडसे येथील त्रस्त शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येने उजागर केले असल्याचे सर्वसामान्य नागरीक बोलतं आहेत.
‼️ गेल्या पाच वर्षांपासून आम्ही समस्याग्रस्त सर्व शेतकरी पाण्यात बुडालेल्या रस्त्यावर पुल बांधून शेतरस्ता तयार करून देण्याची सबंधित विभागाकडे सातत्याने विनंती करीत आहोत, शिवाय ही गंभीर बाब अनेक वेळा विद्यमान आमदार, खासदार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे तरीसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. या बाबत आम्ही जिल्ह्यातील भाजपा नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहोत. तथापि न्याय न मिळाल्यास सरतेशेवटी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबनार आहोत. ‼️
___
विश्वासराव खडसे ( पाटील )
( धरणग्रस्त शेतकरी शेलुखडसे )