दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर: दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी बार्डी ता. पंढरपूर येथील अभयारण्यात दुष्काळजन्य परिस्थितीत चारा- पाण्याविना प्राण्यांची उपासमार होत असल्याने नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णी यांनी प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली आहे.
बार्डी येथील २०० एकर क्षेत्रात असलेल्या अभयारण्यात वनगाई, जंगली बैल, ससे, हरीण, काळवीट, लांडगे व इतर वन प्राणी आहेत. परंतु त्यांची दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्याविना वणवण भटकंती होताना दिसून येत आहे व सध्या जंगलाची बकाल अवस्था झालेली आहे. त्यामुळे वन्यप्राणी चारा व पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत नरसिंह प्रतिष्ठानचे सदस्य पृथ्वीराज शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त केक, हार-तुरे यावर अनावश्यक खर्च न करता बार्डी येथील अभयारण्यात पाण्याचा टँकर देऊन वन्य प्राण्यांची तहान भागविली आहे.. यासाठी त्यांना करकंबचे अमोल (दादा) शेळके, प्रशांत खारे, जागर स्वच्छता अभियान टीम यांचे सहकार्य लाभले.
यावेळी नरसिंह प्रतिष्ठान टेंभुर्णीचे कार्यकर्ते सतिश पवार, विकास पवार, विनायक धनवे, आकाश पवार, यश पवार, अथर्व शिंदे, नवनाथ नलवडे व वन विभागाचे कर्मचारी दिलावर मुलाणी व बार्बी गावचे पोलीस पाटील नानासाहेब शिंदे हे उपस्थित होते..
जंगलातील वन प्राण्यांचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटवण्यासाठी करकंब पार्टी टेंभुर्णी नागरिकांच्या सहकार्याने बोर पाडून मोटर बसण्याचा मानस आहे.
