
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक -मोहन आखाडे
जिल्हा परिषदेत ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांची मेगा भरती करण्यात येणार असून, ऑक्टोबरअखेर यशस्वी ४३० बेरोजगारांना नोकरीचे आदेश दिले जाणार आहेत. या भरतीमुळे जि.प.मध्ये अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार असून, अतिरिक्त काम सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे.
मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत अनेक दिवसांपासून भरती झालेली नसल्यामुळे ४३० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. विशेषत: आरोग्य विभागामध्ये ३१५ अर्थात सर्वाधिक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने जय्यत तयारी केली आहे. सामान्य प्रशासन, बांधकाम, पशुसंवर्धन या विभागांतही कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी सांगितले.
शासनस्तरावरूनच या नोकरभरतीचे कंत्राट ‘आयबीपीएस’ कंपनीला देण्यात आले आहे. उमेदवारांची ऑगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा होईल. सप्टेंबरमध्ये पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात त्यांना नोकरीचे आदेश प्रदान केले जाणार आहेत, असे तुपे म्हणाले.