
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशीम: जुन्या पेन्शनच्या प्रमूख मागणीसह, ईतर महत्वाच्या मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सतत सात दिवस चाललेल्या या संपातील सहभागी कर्मचाऱ्यांचा पगार न कापता त्यांची अर्जित रजा मंजूर करण्यात यावी, यासाठी शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक आमदार ऍड. किरण सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याचे फलित झाले असून, अर्जित रजा मंजूर होणार असल्याने अखेर.. संपकरी कर्मचाऱ्यांच्या आशेचा किरण फुलला; असल्याचे जिल्हयातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी बोलत आहेत.
१४ मार्च ते २० मार्च दरम्यान जुनी पेन्शन योजना व इतर न्याय हक्कासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. परंतु मागण्यासंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर सात दिवसांनी संप मागे घेण्यात आला होता. आणि संपकाळात हे कर्मचारी कामावर गैरहजर असले, तरी त्यांची या काळातील सेवा खंडीत न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता तथापि, या काळातील सात दिवसांचा पगार मात्र, कापला जाणार होता. परिणामी संपात सहभागी झालेले सर्वच कर्मचारी कमालीचे संतप्त झाले होते. कर्मचाऱ्यांमध्ये चाललेली धुसपुस लक्षात घेऊन अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ऍड. किरण सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे संपकरी कर्मचाऱ्यांचा पगार न कापता रजा मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात अखेर शासन निर्णय निर्गमित झाला असून, संपकरी कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा मंजूर होणार आहेत. शिक्षक आमदार ऍड. किरण सरनाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याचे फलित झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधे आनंदाची लाट पसरली असून, सर्व कर्मचारी आमदार ऍड. किरण सरनाईक यांच्याप्रती समाधान व्यक्त करीत आहेत.