दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराने वेग धरला असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आपापले पॅनल विजयी करण्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे. दिवसागणिक प्रचार तोफा धडाडत असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. बाजार समितीत प्रचंड प्रमाणात होणारा भ्रष्टाचार व शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय थांबवायची असेल, तर बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हक्काची असणे खूप महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन रिसोड~मालेगावचे आमदार अमित जनक यांनी केले आहे.
बाजार समिती निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या काँग्रेस, शिवसेना ( ठाकरे ) राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, भूमिपुत्र शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेड प्रणित महाविकास आघाडीच्या बळीराजा परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार झनक म्हणाले की, कार्यक्षेत्रात असलेल्या सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायतचे सदस्य हे या निवडणुकीतील मतदार असून, त्यांना हा बहुमोल अधिकार प्रत्येक गावातील सर्वसामान्य नागरिकांनी प्राप्त करून दिला आहे. पर्यायाने या निवडणुकीत मतदान करणारा प्रत्येक मतदार हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मतदान करणार आहे. शेतकरी हा बाजार समितीचा केवळ मुख्य घटकच नव्हे; तर समितीच्या उत्पन्नाचा मुख्य कणा आहे. मात्र, मुख्य घटक असलेल्या शेतकऱ्यांची बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण, बाजार समितीच्या कारभारात शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता आणण्यासाठी बळीराजा परिवर्तन पॅनल कटिबद्ध असून, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन देखील आमदार अमित झनक यांनी केले आहे. यावेळी महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पॅनलचे सर्व उमेदवार व बहुसंख्या समर्थकांची उपस्थिती होती.
इडा पिडा टळणार ! बळीचे राज्य येणार !!
___ पंजाब बाबा ( सधन शेतकरी )

शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याची व बाजार समितीत शेतकऱ्यांना योग्य सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची मुख्य जबाबदारी बाजार समितीची असते, परंतु आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी निव्वळ राजकारणासाठी बाजार समितीचा वापर केला आहे. छोट्या सोसायट्या निर्माण करून, तिथे मर्जीतले मतदार निर्माण करायचे व आपले एकछत्री सत्तास्थान अबाधित ठेवायचे. त्यामुळे समितीच्या कारभारात मनमानी व भ्रष्टाचार बोकाळला असून, शेतकऱ्यांचे हित व त्यांना अत्यावश्यक असणाऱ्या सोई सुविधांना मात्र कायमची तिलांजली देण्यात आली आहे. यावेळेस हा पायंडा मोडीत निघणार आहे. सर्व इडा, पिडा मतदारांच्या आशीर्वादाने टळणार असून, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले बळीचे राज्य बाजार समितीत येणार असल्याची प्रतिक्रिया तालुक्यातील सधन कास्तकार, प्रगतिशील शेतकरी, कट्टर काँग्रेस समर्थक असलेले तालुक्यातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व पंजाब बाबा यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.
