
दैनिक चालु वार्ता सांगोला वृत्तसेवा :
सांगोला तालुक्यामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार, विधान परिषदेचे माजी आमदार, रेकॉर्ड ब्रेक आमदाराचे नातू , भाजप, स्वयंघोषित काँग्रेस, माने गट, आजी माजी पंचायत समिती सभापती, काही आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हे सर्वजण एकत्रित असताना मी स्वतः या सर्वांच्या विरोधात आरपीआय आठवले म्हणून या पक्षातर्फे उमेदवारी लढवली व तालुक्यातील मतदारांनी मला अपेक्षेप्रमाणे मत देऊन माझे राजकीय अस्तित्व व प्रतिष्ठा वाढवली याबद्दल सर्वच मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
वास्तविक पाहता ही सर्व नेतेमंडळी एकत्रित असताना या मतदारांनी मला स्वीकारणे हे नक्कीच विचार करण्यासारखे आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष व नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ मतदारांनी आणली आहे. हे सर्व नेते मंडळी एकत्रित असताना मला एवढी मते पडणे अपेक्षित नव्हते. परंतु मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मताधिक्य दिले. भविष्यकाळामध्ये मतदारांनी दिलेला प्रतिसाद पाहून राजकारण व समाजकारण करण्यासाठी दुप्पट ऊर्जा मिळाली आहे. तरी भविष्यामध्ये खचून न जाता समाजकार्य करत करत राजकारण हे जोमाने करण्यास जनतेने व मतदारांनी सांकेतिक इशारा दिला आहे. वास्तविक पाहता मतदाराची आकडेवारी काढली तरी या सत्ताधारी नेत्यांच्या उमेदवारास 206 मते मिळाली आहेत. प्रत्येक प्रमुख नेत्यांच्या या 206 मतांची आकडेवारी केली असता प्रत्येक नेत्याच्या वाटणीला किमान फक्त 35 मते येतात आणि मी एकटा स्वतंत्रपणे लढलो असता कुठल्याही तालुक्यातील राजकीय नेत्याचा वरदहस्त नसताना 70 मते मिळवली असून, मी स्वतः विजयी झालो असे ग्राह्य धरतो. तरी सांगोल्यातील व तालुक्यातील ज्या मतदारांनी मला मत देतो असा शब्द दिला होता त्या सर्वांनी मला अपेक्षित असे मत दिले. भविष्यातही या सर्व नेत्यांच्या विरोधात जरी कोणी राजकीय लढाई लढण्यास तयार नसेल तरी मी स्वतः भविष्यात त्यांच्याविरुद्ध कोणतीही निवडणूक लढवेन. त्यावेळी तालुक्यातील मतदारांनी अशीच मला मते देऊन सहकार्य करावे आणि सांगोला तालुक्यातील जेवढे राजकीय सत्ताधारी पक्ष व नेते आहेत ज्यांनी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येऊन सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल चालू केली आहे. त्यांनी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आणि आमदारकीच्या निवडणुकीत सुद्धा एकत्र येऊन निवडणूक लढवावी व एकत्रित येणाऱ्या नेत्यांच्या विरोधात निवडणुकीत मला माझे राजकीय अस्तित्व दाखवण्याची संधी द्यावी. माझे राजकीय अस्तित्व व प्रतिष्ठा ही सांगोला तालुक्यातील मतदार नक्कीच दाखवून देतील ही मला खात्री आहे.