
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- बालाजी देशमुख
बीड –जिल्ह्यातील पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखालील पॅनलणे बाजी मारत 12 जागा जिंकल्या.तर, राष्ट्रवादीचे रामकृष्ण बांगर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला सहा जागा जिंकता आल्या आहेत. सुरुवातीला धस यांनी कडा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध काढण्यात यश मिळविले होते.
आता जिल्ह्यात भाजपच्या खात्यात नऊ पैकी तीन बाजर समित्या आल्या आहेत. जिल्ह्यात कडा, पाटोदा, माजलगाव, वडवणी, केज, बीड, अंबाजोगाई व परळी या बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. सुरुवातीलाच आष्टी मतदार संघातील कडा ही बाजार समितीची निवडणूक बिनविरोध काढण्यात भाजप आमदार सुरेश धस यांना यश आले होते. त्यामुळे भाजपने विजयी ओपनिंग केली होती.
मात्र, नंतर झालेल्या परळी, वडवणी, गेवराई, अंबाजोगाई आदी बाजार समित्या महाविकास आघाडीने जिंकल्या. तर, बीड बाजार समिती निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या आघाडीला राष्ट्रवादी,शिवसंग्राम, भाजप व दोन्ही शिवसेना यांनी एकत्र येऊन केलेल्या परिवर्तनमहाआघाडीने मात दिली. तर, केवळ केज कृषी उत्पन्न बाजार समिती भाजप नेते रमेशराव आडसकर यांनी जिंकली.
शेवटच्या टप्प्यात मतदान झालेल्या माजलगाव मध्येही राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीने विजय मिळविला. तर, पाटोदा बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने राष्ट्रवादीचे रामकृष्ण बांगर यांच्या आघाडीचा पराभव करत 12 जागा जिंकल्या. एकूणच नऊ बाजार समित्यांमध्ये सुरेश धस यांच्यामुळे कडा व पाटोदा आणि रमेशराव आडसकर यांच्यामुळे केज बाजार समिती भाजपच्या ताब्यात आली आहे.