
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : वेळेचं भान आणि प्रवाशांची वर्षोनुवर्षे होणारी कुचंबना ध्यानी घेऊन ठेकेदाराने सामाजिक दायित्व म्हणून हाती घेतलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित होतं, परंतु कामामध्ये केली जाणारी कमालीची दिरंगाई आणि कामाचा निकृष्ट दर्जा बघून संतप्त आमदार डॉ.राहूल पाटील यांनी ठेकेदाराला पुरते खडे बोल सुनावले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून परभणी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानक व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरु आहे. अगोदरच श्रावण मास, त्यात फाल्गुन मास, या उक्तीप्रमाणे अद्ययावत व सुसज्ज अशा भव्य बस स्थानक व प्रशासकीय इमारतीचे दिवा स्वप्न पहात असताना त्या कामालाच दिरंगाई ने ग्रासले आहे. रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर हे बस स्थानक आहे. बांधकामाचा भाग सोडून दर्शनीय भागातील अगदी तोकड्या जागेत परभणी शहराच्या ग्रामीण भागातील प्रवासी जनतेसाठी काही प्रमाणात बसेस सोडल्या जातात. अत्यंत अडचणीचा भाग असूनही प्रवासी नागरिकांना सेवा देणे क्रमप्राप्त समजून ती पुरविली जात आहे. त्यातच प्रवासी जवळचा असो वा लांबचा, रहदारीची सोय करणे हा राज्य परिवहन विभागाचा मानवीय धर्म आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तेथूनच लांब पल्ल्याच्या सुध्दा बसेस सोडल्या जातात. पावसाळ्यात धो धो पडणारा पाऊस परिणामी होणारा चिखल, तरीही नाईलाज म्हणून दररोजचे हजारो प्रवासी ते सर्व सहन करतात. हिवाळा-उन्हाळ्यात व्यापारी व शेतकऱ्यांना मिळणारी सवड, लग्नाचे दिवस, जत्रा व अन्य सोहळे, कार्यक्रम आदींमुळे प्रवाशांची बाहुगर्दी होणे स्वाभाविक आहे. याच गर्दीचा व लग्न सराईचा भूरटे चोर, लुटारुंसारख्या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेत असल्याच्या घटना दिवसागणिक घडत असतात. परिणामी अनेकांची रोकड तर कित्येक महिलांचे दागिने आतापर्यंत लंपास झाले आहेत. मानसिक, आर्थिक व चोरी सारख्या घटनांचा महिनोन्महिने तर सोडाच परंतु वर्षोनुवर्षे त्रास होत असूनही जनता आणखी किती दिवस संयम बाळगणार ? हा खरा सवाल आहे. त्या संयमाचा एकदा का बांध तुटला गेला तर मात्र अशा बेमुर्वत ठेकेदाराला पळता भूई थोडी होऊ शकेल, याचा विसर पडता कामा नये.
मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या बस स्थानकाच्या कामाला गती देण्याऐवजी दिवसेंदिवस शिथिलताच येत असल्याचे जाणवत आहे. हाती घेतलेलं हे बांधकाम किती कालावधीत पूर्ण करण्याची त्या ठेकेदाराला मुदत देण्यात आली आहे, यांची त्याला कल्पना असेलही. कामाचा दर्जा गुणात्मक असला पाहिजे, हे सर्वश्रुत आहे. तथापि सुरु असलेल्या व आतापर्यंतच्या झालेल्या बांधकामात कोणताही गुणात्मक दर्जा दिसत नसून ते कमालीचे निकृष्ट असेच केले जात आहे. नव्हे अशी टीका सर्वत्र केली जात आहे. झालेल्या बांधकामात कोणताही निटनेटकेपणा नसल्याचे समजते. सिमेंट कॉंक्रीट कामामध्ये सिमेंट, रेती, खडीचे प्रमाण हे नियमानुसार वापरले जाणे आवश्यक असते. त्यात कोणतेही मटेरियल कमी अधिक झाले तर कामाचा दर्जा गुणात्मक न होता तो अधिकच बिघडला जातो. त्यातच रेती मिळत नसल्याचा बहाणा करीत रेती ऐवजी डस्ट वापरले गेल्यास त्याचा दर्जा एकदम खालावल्यासारखा होतो. ते काम निकृष्ट बनले जाते. लवकरच कुचकामी ठरले जाते. त्यात वापरले जाणारे लोखंड किती एम्एमचे आणि किती अंतरावर, कुठे वापरले गेले पाहिजे, याची खातरजमा करारानुसार होणे आवश्यक असते. हे सारे मटेरियल व लोखंड ठरल्याप्रमाणे न वापरले गेल्यास कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट, कमी प्रतीचा बनला जाणे स्वाभाविक आहे. किंबहुना तसेच होत असावे म्हणूनच कामाची क्वालीटी हीन झाली असावी. त्याचाच परिपाक म्हणून व्यवसायाने स्वतः बिल्डर असलेले आमदार निकृष्ठ काम असल्याचे सांगत भडकले जाणे स्वाभाविक आहे. किंबहुना त्यासाठीच त्यांनी ठेकेदाराला खडे बोल सुनावले असतील. ते जाणकार व अभ्यासू आहेत. त्यांना मुलत: बांधकाम व्यवसायाची आवड असली तरी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित असल्यामुळेच त्यांनी समाजसेवा निवडली. पर्यायाने ते आमदार नव्हे तर लोकसेवक बनले गेले.
परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे ते एकमेव आमदार आहेत. जनहितार्थ कामे करण्याची त्यांना कौशल्यपूर्ण अशी हातोटी आहे. नागरी व सर्वांगीण विकास कामांच्या जोरावरच ते लोकप्रिय व लोकाभिमुख नेते बनले गेले आहेत. ते संयमी आहेत. कुशल आहेत. याचा अर्थ हा नाही की, ते काहीच बोलत नाहीत. त्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन ठेकेदार जाणीवपूर्वक दिरंगाई करणार असतील किंवा कामाचा दर्जा सुधारणार नसतील तर त्याचीही किंमत ठेकेदाराना एक ना एक दिवस मोजावीच लागेल. याचेही विस्मरण होता कामा नये. ज्या मतदार जनतेनी डॉ. राहूल पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे, त्या जनतेची ते प्रतारणा करणार नाहीत. नागरी मुलभूत सुविधांचा आणि हक्काच्या शासकीय सोई-सुविधांचा लाभ मतदार जनतेला येणकेण प्रकारे मिळालाच पाहिजे, अशीच त्यांची भावना राहिली जाणे क्रमप्राप्त आहे. तथापि त्यांच्या सहानुभूती पूर्ण स्वभावाचा गैरफायदा घेऊन ठेकेदार जर नियोजित कामात काही तरी काळेबेरे करु पहात असणार किंवा त्रुटी ठेवण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते कदापि शक्य होणार नाही. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना ठेवून नव्हे नियोजित कामाचा ठरल्याप्रमाणे मोबदलाही घेतो, तरीही वेळेत ते पूर्णत्वास न नेता त्यात कमालीची शिथिलता आणि ते काम दर्जाहीन होणार असेल तर मुळीच खपवून घेतले जाणार नाही, याचा विसर त्या ठेकेदाराला मुळीच पडता कामा नये. शेतकरी राजाच्या संयमाचा बांध तुटला तर मात्र फसवणूक करु पहाणाऱ्या या ठेकेदाराला पळता भूई थोडी होईल, याची जाणीव असावी, बस्सी एवढेच.