
प्रा.डाॅ. व्यंकट चव्हाण…
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी शिवकुमार बिरादार
मुखेड – आज कै. वसंतराव नाईक साहेबांची ११० वी जयंती आहे. त्यांनी सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. प्रख्यात कृषी तज्ञ, प्रगतिशील शेतकरी व राजनीतिज्ञ म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जाते. त्यांनी हरितक्रांती व श्वेत क्रांती केली. पंचायत राज व्यवस्था आणली, 1972 ला महाराष्ट्रात जेंव्हा दुष्काळ पडला तेंव्हा त्यांनी दूरगामी योजना आणल्या. भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला स्थिर स्थावर जीवन दिले, नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. ज्या ज्या खात्याचे ते मंत्री राहिले त्या त्या खात्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. 1989 पासून त्यांचा जन्मदिवस देशभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी विद्यापीठांची स्थापना, रोजगार हमी योजना ,कापूस एक अधिकार योजना, आश्रम शाळा चळवळीचा प्रारंभ, औष्णिक विद्युत केंद्राची उभारणी, बालभारतीची निर्मिती, मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, राज्य विज्ञान संस्थेची स्थापना, एम.आय.डी.सी.ची स्थापना, विरोधी पक्षाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देणे या व या सारख्या अनेक समाज उपयोगी निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी केली. त्यांचे शेती व मातीवर जीवापाड प्रेम होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि मातीसाठी अर्पित केले असे प्रतिपादन प्रा.डाॅ.व्यंकट चव्हाण यांनी ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड जि.नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आयोजित कै.वसंतराव नाईक जयंती दिनी प्रमुख वक्ते म्हणुन बोलताना केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की आपले वसंतनगर हे स्थान वसंतराव नाईक साहेबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आहे. इथे त्यांच्या उपस्थितीत आश्रम शाळेच्या रूपाने लावलेल्या या शैक्षणिक वृक्षाचे आज वट वृक्षात रूपांतर झाले आहे. ते जनतेत रमणारे नेतृत्व होते. सामान्य जनतेच्या समस्या ते अस्थेवाईकपणे समजून घेऊन सोडवत असत. त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या अनुभवातून आलेले होते.आज हरितक्रांतीने धनधान्या बाबतीत आपण जरी समृद्ध झालो असलो तरी संकरित बियाण्यांंमुळे अनेक आजार जडताहेत.त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. ज्याच्या सेवनाने अस्या आजारांपासून आपली सुटका होते. तेंव्हा आपणही याकडे डोळसपणे लक्ष देणे आजच्या जयंती दिनी मला महत्त्वाचे वाटते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.एस. बाबाराव यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सौ. अरुणा ईटकापल्ले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण कुमार थोरवे,स्टाफ सेक्रेटरी प्रा.डाॅ.नागोराव आवडे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.