जालना प्रतिनिधी आकाश माने
जालना: सेलू रेल्वेमार्गावरील मानवतरोड ते सेलू स्थानकाच्या दरम्यान एक मोठी दुर्घटना होता होता टळली.
: सेलू रेल्वेमार्गावरील मानवतरोड ते सेलू स्थानकाच्या दरम्यान एक मोठी दुर्घटना होता होता टळली. ढेंगळी पिंपळगावजवळ मार्गावर रेल्वे रुळ तुटला होता, ही बाब लक्षात येताच गँगमनने लोको पायलटला सूचना केली. त्यामुळे ट्रेन काही अंतरावर आधीच थांबवण्यात आली. गँगमन तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
अन्यथा पुढच्या काही तासात रेल्वे रुळ तुटून मोठी घटना घडली असती. मिळालेल्या माहितीनुसार, सेलू मार्गावर मानवतरोड ते सेलू स्थानकाच्या दरम्यान ढेंगळी पिंपळगाव जवळ धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे जात असतांना रेल्वे रुळाचा स्लीपरचा एक भाग तुटल्याचे गँगमनच्या लक्षात आले.
सतर्कता दाखवत गँगमनने ट्रेनला रेड सिग्नल दिला. त्यामुळे मोटारमनने ट्रेन काही अंतरावर आधीच थांबवली. ही घटना बुधवारी (ता.१९) रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नाही.
रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच मदत कार्य करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी येत असल्याचे समजते. रेल्वे रुळाच्या एक स्लीपर कशामुळे तुटला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे तसेच परभणीकडून जालन्याकडे जाणाऱ्या रेल्वेच्या काही फेऱ्या विलंबाने धावत आहेत.
