दत्तात्रय वामनराव कराळे…
परभणी : लाखो वाचक आणि हितचिंतकांचे अफाट प्रेम प्राप्त केलेल्या ‘चालु वार्ता’ मराठी दैनिकाने अल्पावधीतच यशोशिखरावर भरारी घेतली आहे. अर्थातच या प्रगतीसाठी दैनिकाच्या कार्यरत सर्व परिवाराने ओतप्रोत असे झोकून दिले असल्यामुळे त्यांचाही यात सिंहांचा वाटा आहे. किंबहुना त्यासाठीच परिवारातील सर्व पत्रकार-पदाधिकाऱ्यांचा *’द्वितीय स्नेह मेळावा’* आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार, दि.२८ जुलै २०२३ रोजी दुपारी ठिक १ वाजता सुरु होणारा हा स्नेह मेळावा विद्येचे माहेरघर संबोधले जाणाऱ्या पुणे नगरीत उत्साहाने पार पाडला जाणार आहे.
सदर स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि हडपसर-पुणे विभागाचे मा.आमदार महादेव (आण्णा) बाबर उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय रा.कॉं.चे शहराध्यक्ष तथा पुणे नगरीचे मा.महापौर प्रशांत जगताप, मनसेचे नेते तथा मा.नगरसेवक वसंत (तात्या) मोरे, शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष तथा मा.नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, मा.नगरसेवक अजय खेडेकर, विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर इडेकर आणि पुणे शहर राष्ट्रवादीचे चिटणीस प्रशांत गांधी आदींची प्रमुख उपस्थिती लाभली जाणार आहे.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स हॉल, टिळक रोड, स्वारगेट चौक, पुणे येथे आयोजित वृत्तपत्रीय संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन, स्नेह मेळावा आणि स्नेह भोजन या उपक्रमास ठिक वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आमचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन दैनिक चालु वार्ता चे मुख्य संपादक डि.एस. लोखंडे पाटील यांनी केले आहे.
