
मरावे परी किर्तीरूपी उरावे राजेश कौसल्ये अमर रहे…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड : – नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील चिंचोली येथील भुमिपुञ राजेश कौशल्य हे सन 2009 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. सुरुवातीला नांदेड येथे त्यांनी काम केले. सन 2018 साली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सुरुवातीला ते पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेत उत्तम प्रकारे काम केले.
ते 2 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या दुचाकीवरून जात होते. मोशी येथे त्यांच्या दुचाकीला अचानक कुत्रा आडवा आला. त्याला वाचविताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा अपघात झाला. त्यांनी हेल्मेट घातलेले होते. मात्र, अपघातात त्यांचे हेल्मेट डोक्यावरून निघाले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
रात्री दीड वाजताची वेळ होती. रस्त्याने येणारे जाणारे कुणीही नव्हते. त्यामुळे सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. काही वेळाने तिथून जाणाऱ्या एका पीएमपी बस चालकाच्या हा प्रकार निदर्शनास आला.
त्या चालकाने एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले.
राजेश यांच्या अपघाताची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. दरोडा विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वायसीएम रुग्णालयात धाव घेतली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजेश यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
मरावे परी किर्तीरूपी उरावे या म्हणीप्रमाणे समाज सेवेची जाण असलेल्या राजेश यांनी त्यांचे अवयव दान करण्याचा अर्ज भरला होता. रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी दि १३ सायंकाळी त्यांना मेंदुमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी देखील अवयव दानासाठी संमती दिली. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली असता त्यांचे अवयव दान करण्यात आले.