
लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे करण्यात आले वितरण…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) :दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील विमुक्त व भटक्या जाती आणि आदिवासी जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मतदार नोंदणी व जातींचे दाखले विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबीराला बुधवार (दि.२३) रोजी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी भेट देऊन फासेपारधी नागरिकांना प्रमाणपत्राचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबीरामध्ये ई-रेशन कार्ड,दुय्यम शिधापत्रिका,उत्पन्न व जातीचे दाखले,आधार कार्ड,नॉन क्रिमीलेअर दाखल्यांचे वितरण करण्यात आले.तसेच दारापूर येथील दोन व खेलनागवे येथील दोन अशा एकूण चार अंगणवाडी केंद्रांना पंधराव्या वित्त आयोगातून गॅस सिलेंडर व गॅस शेगडीचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.त्यानंतर उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता तेथील कामकाज पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली.त्यानंतर दर्यापूर तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाना भेट देऊन आढावा घेतला.दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील डॉक्टरांशी संवाद साधला व तेथील रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या.दुपारनंतरच्या सत्रात दर्यापूर तालुक्यातील सुकळी येथे भेट दिली.तेथील शहानुर नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवासांचे भूस्खलनामुळे होत असणारे नुकसान याची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.भेटी दरम्यान उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर,आदिवासी पारधी विकास संघटनेचे बाबुसिंग पवार व तालुका समन्वयक नरेश पवार उपस्थित होते.