
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे:( इंदापूर) तालुक्यातील शेटफळ येथील ग्रामस्थांमध्ये ग्रामसभेबाबत उदासीनता आल्याचे चित्र गावामध्ये झालेल्या ग्रामसभांवरून दिसून येते. या ग्रामसभेला ग्रामस्थ उपस्थित राहत नाहीत, असा अनुभव आहे. ग्रामस्थ का उपस्थित राहत नाहीत, यासाठी ग्रामपंचायतने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत शेटफळ हवेली गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
शेटफळ हे तालुक्यातील म्हत्वाचे गाव असून, लोकसंख्या ६ हजारांच्या घरात आहे. ग्रामसभा कायदा सुरू झाल्यापासून प्रत्येक ग्रामसभेसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हा गावचा इतिहास आहे. ग्रामसभा कधी खेळीमेळीत, तर कधी वादळी होऊन नागरिक आपल्या समस्या मांडत असतात. त्यामुळे शेटफळच्या ग्रामसभेची चर्चा तालुक्यात होत असे. या ग्रामसभेत काय होणार याची उत्सुकता संपूर्ण परिसरातील गावांना असते.
शेटफळ हवेली च्या राजकीय परिस्थिती वरती आजुबाजुच्या गावांचे राजकीय वातावरण अवलंबून असल्याने या ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहते. या ग्रामसभेत ग्रामस्थ ही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या समस्या, तसेच गाव विकासाबाबत राबवायच्या योजनांवर सविस्तर चर्चा करतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून ग्रामसभा पाहता आश्चर्य वाटावे. ही परिस्थिती शेटफळमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामसभेसाठी ग्रामस्थ उपस्थित रहात नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. ग्रामसभेचे अधिकार, महत्त्व शेटफळ ग्रामस्थांना चांगलेच ज्ञात असल्याचे यापूर्वी झालेल्या ग्रामसभांमधून दिसून आले आहे, तरीही शेटफळ हवेलीतील ग्रामस्थ ग्रामसभेकडे पाठ का फिरवतात याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकार्यांनी निश्चितच आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत संजय शिंदे यांनी व्यक्त केले आहे.