
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे… जालना (मंठा )
यावर्षी अत्यल्प पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाच्या भरव शावर शेतकऱ्यांनी महाग मोलाचे बियाणे खरेदी करून खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, तूर, उडीद, कापसाची लागवड केली. आज ना उद्या पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पावसाची आतुरतेने वाट पाहिली. शेवटी निसर्गाने दगा दिला. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली, अनेक भागात पिके करपून गेली, पाऊस नसल्याने फळबागाही सुकून गेल्या. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून चिंताग्रस्त झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याची गरज आहे. यासाठी शासनाने पंचनाम्याची अट न ठेवता जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.