
धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ; जिल्ह्याभरात…
दै.चालु वार्ता
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
जिल्ह्यातील सराटी अंतरवाली या गावात सुरू असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे. पोलीसांनी उचललेले हे पाऊल म्हणजे शांत मराठ्यांना डिवचवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यासह राज्यभरात या घटनेचा निषध व्यक्त करण्यात येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंबड तालुक्यातील शहागड येथील मराठा जनआक्रोश आंदोलनासाठी गोदाकाठच्या बीड व जालना जिल्ह्यातील मराठा समाज हजारोंच्या संख्येने एकवटला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरु होते.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात छोट-मोठे जवळपास शंभरावर आंदोलने आतापर्यंत समाजाने केली आहेत. याच आंतरवाली सराटी येथे 10 वेळा उपोषण-आंदोलन करण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने उपस्थिती असतांनाही आतापर्यंतची आंदोलने ही शांततेत पार पडली आहे. आंतरवाली सराटे येथील आंदोलनही गेल्या तीन दिवसांपासून शांततेत सुरू होते. शुक्रवार (दि 1) आज आंदोलनाचा चौथा दिवस होता.
29 ऑगस्टपासून हे उपोषण आंदोलन सुरु होतं. मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. त्यानंतर आज पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. लहान मुलं, महिला कुणालाही पाहिलं नाही. प्रचंड लाठीचार्ज केल्यानंतर आम्ही शांत का बसायचं असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.
जिल्ह्यासह राज्यभरात घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर गाड्यांवर दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येत उपस्थित राहत अनेक मोर्चे-आंदोलने शांततेत काढणार्या मराठा समाजाच्या या आंदोलनादरम्यान पाच-सात हजार समाजबांधव उपस्थित होता. अशा वेळी नेमके काय घडलं, कशामुळे घडलं हा प्रश्न उपस्थित केल्या जात असून शांत मराठ्यांना डिवचवण्याचा हा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं आहे..?
आम्ही शांततेत आंदोलन सुरु केलं होतं. आम्ही शांतपणेच उपोषण आंदोलन करत होतो. काल आमचं शिंदेसाहेबांचं (मुख्यमंत्री) आणि आमचंही बोलणं झालं. आज अचानक खाडे म्हणून कुणीतरी आले. मला म्हणाले की तुम्ही उपचार घ्या. त्यानंतर मी हो म्हटलं. मात्र पोलिसांनी बहुदा आंदोलन मोडायचं ठरवलं आहे. पण माझं मराठा आंदोलकांना आवाहन आहे की जाळपोळ करु नका, तोडफोड करु नका. जे काही झालं ते ब्रिटिशांच्या काळातही घडलं नव्हतं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सगळ्या बांधवांनी शांत रहावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.