
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
*लातूर (उदगीर) :* उदगीर शहराचे बस स्थानक भव्य दिव्य होणार म्हणून गेल्या सहा सात वर्षांपासून उदगीरची जनता आतुरतेने वाट पाहत होती. या बसस्थानकाची मंजुरी माजी आ. सुधाकर भालेराव यांनी मिळवल्यानंतर, भूमिपूजनाचा दगडही रोवला होता. मात्र तांत्रिक बाबी खाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी कमी करून पुन्हा मंजुरी देण्यात आली. पुन्हा निविदा सुरू झाली. त्यावेळी पूर्वीचा भूमिपूजनाचा दगड उखडून टाकून, नवा दगड लावून श्रेय घेण्यासाठी सर्वांनी धडपड केली होती. त्यानंतर बसस्थानकाचे कामही सुरू झाले. गेल्या वर्षी पाऊस झाला आणि बसस्थानकाच्या पर्यायी शेडमध्ये लोकांना बसायलाही जागा नाही, थांबायलाही जागा नाही, शेडमध्ये भौतिक सुविधेचा अभाव पाणी,लाईट नाही. आणि रस्त्यावर सर्वत्र चिखलच चिखल,असे चित्र झाल्यानंतर पुन्हा मोठा निधी आणून छोट्या कंत्राटदाराला सांभाळले गेले. मुरूम टाकून तात्पुरता रस्ता बनवला गेला. वास्तविक पाहता हे सर्व पर्यायी व्यवस्थेचा भाग बहुदा मुख्य निविदेमध्ये असावा, पण वाढपी आपला असल्याने निधी आला, कंत्राटदाराने त्याची विल्हेवाट लावली. आता पुन्हा त्याच कामासाठी पुन्हा निधी मागणी करून पुन्हा तीच ती अवस्था निर्माण करण्यामध्ये काही कार्यकर्ते धडपड करत असल्याचे समजते. जोपर्यंत बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण होत नाही, तोपर्यंत बाजूच्या शेडमध्ये आणि बस येण्याच्या रस्त्याची व्यवस्था कंत्राटदाराने करणे गरजेचे असतानाही राजकीय वरदहस्ताचा लाड असल्यामुळे कंत्राटदार बिनधास्त आहेत. मात्र जनतेची मोठी गोची होत आहे. एका बाजूला चिखलच चिखल, तर दुसऱ्या बाजूला खड्डेच खड्डे ! अशी अवस्था झाल्याने बसस्थानक आहे की खड्ड्यांचा बाजार? अशीच अवस्था निर्माण झाली आहे. बसस्थानकावर हव्या त्या कोणत्याही सुविधा नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्थानक हे उत्तरत्या जागेवर असल्यामुळे नांदेड बिदर रस्त्यावरील पाणी सरळ बस स्थानकात येत आहे. त्यामुळे सर्व परिसर जलमय बनला आहे. दुसऱ्या गावाच्या प्रवाशांना कुठे खड्डा आहे? आणि कुठे पाणथळ आहे? हे लक्षात न आल्याने बाहेरगावी निघालेले अनेक प्रवासी घसरून पडत आहेत. त्यांची होणारी तारांबळ हा वेगळाच प्रश्न आहे. प्रवाशांना थांबण्यासाठी उभारलेले शेड अपुरे आहेत, उन्हाळ्यात लोक आजूबाजूच्या झाडाखाली थांबून आसरा घेत होते. मात्र पावसाळ्यात भिजल्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी अवस्था प्रवाशांची होत आहे. भरघाव येणाऱ्या बसेस आजूबाजूला थांबलेल्या प्रवाशांच्या अंगावर बिनधास्तपणे चिखल मिश्रित पाणी उडवत निघून जातात.
एकंदरीत सर्वच बाजूंनी प्रवाशांची मोठी हेळसांड होत आहे. राजकीय पुढारी मात्र ज्या पद्धतीने गेल्या वर्षी दहा लाख रुपयांचा निधी अशाच कामासाठी आला होता, तो पुन्हा यावा आणि आपल्याला फायदा व्हावा. यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. वास्तविक पाहता या तात्पुरत्या सुविधा बसस्थानक व्यवस्थापकाकडून महामंडळाकडे पाठपुरावा करून, पूर्ण करून घेणे अपेक्षित आहे. मात्र यांना विचारावे कोण? सर्वच लोकांना राजाश्रय असल्याने नाईलाजाने सर्व काही अलबेल आहे. असे सांगत लोक गप्प बसत आहेत. ही लोकशाहीची सर्वात मोठी थट्टा आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.