
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी साहित्यिक डॉ नरसिंग कदम यांची निवड
दै.चालु वार्ता, (अविनाश देवकते),
उदगीर, प्रतिनिधी
उदगीर : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, कथाकार, वात्रटिकाकार, संपादक तथा समीक्षक प्रा.डॉ नरसिंग कदम यांची नुकतीच निवड झाली. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या आधीन असलेला महत्वाचा प्रकल्प आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे.
प्रा. डॉ. नरसिंग कदम हे शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथे गेल्या वीस वर्षापासून मराठी विभागात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर येथे चार वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्य केलेले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून कलेक्टरनी दोन वर्षासाठी त्यांची निवड केली होती. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी सतत कार्य करुन आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय परिषदामध्ये सहभाग, पेपर वाचन केले, अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत.त्यांनी जीवनशैली (चारोळी संग्रह) निर्भया,गोंडर (कवितासंग्रह),धडक-बेधडक (वात्रटिकासंग्रह) संघर्षयोद्धा बापूसाहेब (चरित्रात्मक कवितासंग्रह) हे साहित्य लिहिले. तर श्रीराम गुंदेकरः व्यक्ती आणि वाङ्मय, महानुभाव संप्रदायः स्वरूप आणि विशेष, महात्मा फुलेंचे कार्य : शोध आणि बोध, महात्मा फुले : साहित्य आणि विचार, आधारस्थंभ बाप, काँग्रेड अण्णा भाऊ साठे आणि मार्क्सवाद, आधुनिकीकरण आणि बदलते आयाम हे त्यांचे संपादित ग्रंथ आहेत. लातूर जिल्याचा दोन वर्षाचा इतिहास ‘लातूर वसा आणि वारसा’ या संपादित ग्रंथात संकलित केला त्याचे ते संपादकीय सदस्य आहेत. यापूर्वी त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय अशा अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची निवड केलेली आहे. ते मराठी भाषेची सेवा सतत करत आहेत त्याचे फलित म्हणजे ही निवड आहे. साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ते आपले नाव लौकिक करत असल्यामुळे व या निवडीबद्दल त्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव पी.टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सहसचिव हिरागीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, सदस्य ज्ञानदेव झोडगे, रामराव एकंबे, काकासाहेब पाटील, भिमराव पाटील, व पृथ्वीराज पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम नवले, उपप्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे, प्रबंधक बालाजी पाटील,प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, पत्रकार बांधव ,मित्रपरिवार,नातलग यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.