
राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही अजूनही जागा वाटपांच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्येही जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाआघाडीत तीन प्रमुख पक्ष असल्याने जागा वाटपाचा तिढा वाढला आहे.
दोन्ही आघाड्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बंडखोरीचा धोका संभवत आहे. अशातच आता पक्षाच्या नेत्यांकडून बंडखोरांना इशारा दिला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी थेट भुजबळांना इशारा दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघ महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेकडे गेला आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याच मतदार संघात समीर भुजबळ देखील इच्छुक आहेत. मात्र समीर भुजबळ यांना ही उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. नांदगाव मधून मागील निवडणुकीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळांचा पराभव केला होता.
आता, समीर भुजबळ नांदगाव मधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. नांदगाव येथे बंड करायचे असेल तर अगोदर पक्षातून राजीनामा द्या अजित पवार यांनी म्हटले असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समीर भुजबळ यांना अशी तंबी दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र तंबी दिल्याच्या वृत्ताला समीर भुजबळ यांनी इन्कार केला आहे.
अजितदादांच्या इशाऱ्यानंतर काय करणार..?
उद्या छगन भुजबळ येवला मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यानंतरच समीर भुजबळ नांदगाव बाबत स्पष्ट भूमिका घेणार असल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघावरून महायुतीमध्ये हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा दिसण्याची शक्यता आहे.