राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून अनेक ठिकाणी कडेकोट नाकाबंदी आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कोट्यवधींची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, मुंबईत एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बॉल जप्त करण्यात आले आहेत.
एका इलेक्ट्रिशियनकडे हे सोन्याचे बॉल सापडले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री एका इलेक्ट्रिशियनकडे एक कोटी ११ लाख रुपये किंमतीची सोन्याची पावडर असलेले बॉल सापडले. मूळचा चेन्नईचा असलेल्या इलेक्ट्रिशियनचे नावं अब्दुलकर अब्दुल मजीद असं आहे. त्यानं डोंगरीतील शकील नावाच्या व्यक्तीकडून हे चेंडू घेतले होते. तिथून हे अंधेरीत एका व्यक्तीकडे द्यायचे होते. पण संबंधित व्यक्तीकडे पोहोचवण्याआधीच इलेक्ट्रिशियनला पोलिसांनी अटक केलीय.
अब्दुल हा वडाळा परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं ताब्यात घेतलं. जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्याकडे १४५७.२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बॉल सापडले. त्याला या सोन्याच्या बिलाची पावती दाखवण्यास सांगितले पण त्याच्याकडे याची कोणतीच माहिती नव्हती. जप्त केलेले चेंडू हे प्लास्टिक टेपने गुंडाळून ठेवले होते. पोलिसांनी सोन्याची पावडर असलेले चेंडू जप्त केले असून आरोपीला अटक केलीय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या अब्दुलची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, त्याच्याकडे सापडलेलं सोनं हे शकील नावाच्या व्यक्तीचं आहे. अब्दुल चेन्नईचा असून डोंगरीतील दर्गा भागात राहत होता. याच भागातल्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्यानंतर अब्दुलच्या चुलत भावानं सोन्याच्या पावडरचे बॉल शकीलकडून घेतले आणि ते अंधेरीत द्यायचे होते. ते देण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी अब्दुलला पकडले आणि सगळा प्रकार उघडकीस आला. हे सोनं कुठे, कशासाठी नेलं जात होतं याचा अधिक तपास केला जात आहे.

