
पुणे:राज्यात महाविकास आघाडीमध्ये (मविआ) कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नसल्याचे काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पुन्हा स्पष्ट करत पक्षाच्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले.
‘मविआ’च्या अधिकृत उमेदवारांविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले असल्याचे चेन्निथला यांनी गुरुवारी सांगितले. मात्र किती आणि कोणत्या बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांची नावे पक्षाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
मात्र राजेंद्र मुळक (रामटेक), याज्ञवल्क्य जिचकार (काटोल), जयश्री पाटील (सांगली), कमल व्यवहारे पुणे- कसबा मतदारसंघ), आबा बागूल (पुणे- पर्वती), मनीष आनंद (पुणे- शिवाजीनगर) या बंडखोरांवर काँग्रेसने कारवाई केल्याचे समजते.
चेन्निथला म्हणाले. ”महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या गॅरंटी सरकार येताच लागू केल्या जातील. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या’गॅरंटीं’विरोधात चुकीची माहिती व अफवा पसरवणाऱ्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. अनेक वर्तमानपत्रात ही जाहिरात कोणी दिली त्याचे नाव नाही. याविरोधात तक्रार करणार आहे,” असे त्यांनी सांगितले
कर्नाटक, तेलंगण, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ज्या ‘गॅरंटी’ दिल्या त्याची अंमलबजावणी सुरु आहे, पण भाजप जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहे. महालक्ष्मी योजनेसह सर्व ‘गॅरंटी’ जाहीर करताना त्याचा अभ्यास केला आहे. आर्थिक तरतूद कशी केली जाईल यावर सखोल चर्चा करूनच त्या जाहीर केल्या आहेत.
काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना चेन्निथला म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून १३ ते १८ नोव्हेंबर या काळात राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा होतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १२, १४ व १६ नोव्हेंबर रोजी तर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी या १३, १६ व १७ नोव्हेंबरला प्रचारसभा घेणार आहेत.
तेलंगणचे मुखमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. काँग्रेसने नुकतीच लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केलेली आहे. त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाणार आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीचा (मविआ) संयुक्त जाहीरनामा रविवारी (ता.१०) खर्गे यांच्या उपस्थितीत प्रकाशित केला जाणार आहे.