
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता या चारही भूमिका उत्तमरित्या पेलणारा कलाकार म्हणजे हेमंत ढोमे. हेमंत नेहमी वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट घेऊन येत असतो. ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ यांसारखे दर्जेदार चित्रपट हेमंतने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत.
नवीन वर्षात हेमंत नवा चित्रपट घेऊन येत आहे. ‘फसक्लास दाभाडे’ असं चित्रपटाचं नाव आहे. अशातच हेमंत ढोमेच्या कुटुंबात नवीन सदस्य आली आहे; जिच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता हेमंत ढोमे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. शिवाय आजूबाजूला चालणाऱ्या घडामोडींवरही हेमंत परखड मतं मांडत असतो. नुकतंच त्याने कुटुंबात आलेल्या नवीन सदस्याचा फोटो शेअर केला आहे.
हेमंत ढोमेच्या कुटुंबात आलेली ही नवीन सदस्य गाय आहे. या गायीचा फोटो शेअर करत हेमंत म्हणाला, ‘आपल्या फॅमिलीची नवी मेंबर. लक्ष्मी ढोमे.’ त्यानंतर हेमंतने गायीचा अजून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे, ‘देखणी लक्ष्मी.’ हेमंतने शेअर केलेल्या या सुंदर गायीचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.
हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी
दरम्यान, हेमंत ढोमेच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा ‘फसक्लास दाभाडे’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजसी भावे, राजन भिसे असे तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट २४ जानेवर २०२५ला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा जबरदस्त पोस्टर प्रदर्शित झाला होता.