
धीरेंद्र शास्त्रींचा आयोजकांना अजब सल्ला; चर्चांना उधाण…
धीरेंद्र यांच्या विधानामुळे सोशल मीडियात दोन गट तयार झालेत
धीरेंद्र शास्त्रींनी लव्ह जिहादसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी गरबा महोत्सवात धार्मिक नियम ठेवण्याची गरज असल्याचं म्हटलंय
सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय ठरलाय
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी बागेश्वर धाममधील धीरेंद्र शास्त्री यांनी गरब्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. गरबा खेळायला येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडा, असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी सनातन धर्माची रक्षा करण्यासाठी योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी समाजात द्वेष पसरवणारं वक्तव्य म्हटलं आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या त्यांच्या आजोळी पोहोचले आहेत. तेथून धीरेंद्र शास्त्री रविवारी लवकुश नगर येथील बंबर बनी यांच्या दर्शनासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी आयोजित गरबा महोत्सवावर प्रश्न उपस्थित केले. धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं की, कोणीही सनातनी व्यक्ती हज यात्रेला जात नाही. आमची एकच इच्छा आहे की, कोणताही इतर धर्माचा व्यक्ती आमच्या गरबा महोत्सवात येऊ नये’.
शास्त्री यांनी गरबा आयोजन समितीला सल्ला देताना म्हटलं की, ‘गरब्याच्या गेटवर गोमूत्र ठेवावं. ते गोमूत्र गरबा खेळण्यास येणाऱ्या व्यक्तीवर शिंपडवावं. असे केल्याने इतर धर्माचे लोक गरबा खेळायला येणार नाहीत, असा अजब सल्ला धीरेंद्र शास्त्रींनी दिला आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी पुढे म्हटलं की, ‘लव्ह जिहादसारख्या घटना रोखण्यासाठी करणे गरजेचे आहे. गरबा महोत्सवात गैरधर्मीयांची घुसखोरी रोखली पाहिजे’. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही जण त्याचं समर्थन करत आहेत. तर काही जण धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा विरोध करत आहे.