
मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज !
गाडी जाळल्यामुळे ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जहरी टीका केली. नवनाथ वाघमारे यांच्या मते या घटनेसाठी मनोज जरांगे पाटील जबाबदार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनीच गाडी जाळली असा दावा नवनाथ वाघमारे यांनी केलाय. मनोज जरांगेची अवकात असेल तर त्याने स्वतः रस्त्यावर यावं असं नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिलं आहे. दुसऱ्याला समोर करून हे कृत्य करणं चुकीचं आहे. जरांगे पादरा प्राणी आहे असा बोचणारा टोला त्यांनी लगावला.
नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ कार काल एका अज्ञात व्यक्तीने जाळली. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती. एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन गाडीच्या जवळ आला.गाडीवर टाकलेल्या कव्हरवर त्याने आधी कॅनमध्ये असलेला ज्वलनशील पदार्थ टाकला त्यानंतर कार पेटवून दिली.
‘जरांगेच्या घरावर जायला सुद्धा आमची पोर घाबरणार नाहीत’
या सगळ्यामागे मनोज जरांगे पाटील आहेत, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. “यापूर्वी त्यांनी अनेक मराठा तरुणांना असच फसवलं,हल्ले करायला लावून स्वतः अंतरवलीच्या बिळात जाऊन लपायच” असं नवनाथ वाघमारे म्हणाले. “आम्ही खरं बोलतो म्हणून यांच्या बुडाला आग लागते. मी, शरद पवार, रोहित पवार राजेश टोपे या सर्व नेत्यावरती बोलल्यामुळे यांच्या बुडाला आग लागली. जरांगेने जास्त माज दाखवला तर आम्ही जरांगेच्या गाड्या अडवू, जरांगेच्या घरावर जायला सुद्धा आमची पोर घाबरणार नाहीत” असा नवनाथ वाघमारे यांनी इशारा दिला.