
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. या विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ३० तारखेला होईल अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
परंतू, त्यानंतर या तारखेबाबत संभ्रम पसरवला जात होता. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला असून ३० तारखेला या विमानतळाचे लोकार्पण होणार नाही अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. तसेच या विमानतळाला दि.बा पाटील यांचेच नाव दिले जाणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी-कोळी भूमीपुत्र समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मध्यंतरी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांनी एक बाईक रॅली काढत या समाजातील भावनांना वाट करुन दिली. विमानतळाचा उद्धाटन सोहळा जवळ येत आहे.परंतू, अद्याप विमानतळाच्या नामकरणाविषयी स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे नामकरणाविषयीची मागणी अधिक तीव्र स्वरुपात पुढे येऊ लागली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यासंबंधीचे आंदोलन हाती घेतले होते. त्यास भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांची उघड साथ असल्याचेही स्पष्ट होते. असे असताना अजूनही नामकरणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्यामुळे भाजपचे स्थानिक नेते अस्वस्थ झाले आहेत.
या विमानतळ नामकरणाबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि कपिल पाटील उपस्थित होते. या बैठकीत बाळ्या मामा यांनी ठाम भूमिका मांडली की, विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव आंदोलन केल्यावरच लागेल त्यामुळे दि.बा पाटील यांच्या नावासाठी आंदोलन करावेच लागेल. यावर प्रतिउत्तर करत कपिल पाटील म्हणाले, आंदोलन करुन विमानतळाला लगेच नाव लागणार असेल तर, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एकप्रकारे कपिल पाटील यांनी आंदोलन करायचे नाही अशीच भूमीका मांडली. एकप्रकारे या बैठीकीत बाळ्या मामा आणि कपिल पाटील यांच्यात वाद पेटलेला पाहायला मिळाले.
या विमानतळाचा लोकार्पणाच्या तारखेबाबत संभ्रम पसरला होता. नक्की या विमानतळाचे लोकार्पण ३० तारखेला होईला असा सवाल सर्वांना पडला होता. परंतू, आता वनमंत्री गणेश नाईक यांनी ३० तारखेला विमानतळाचे लोकार्पण होणार नाही अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांचे नेते दी. बा पाटील यांचेच नाव या विमानतळाला लागेल अशी संमती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मिळाली आहे. केंद्र सरकारकडून त्याला अंतिम संमती आल्यानंतर या विमानतळाचे नाव दी.बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच राहिल, असा विश्वास देखील नाईक यांनी व्यक्त केला.