
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचा निकाल अतिशय धक्कादायक लागलाय. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला 231 पेक्षा जास्त जागांवर यश मिळालायचं पाहिला मिळलाय.
यात भाजप पक्ष पुन्हा एकदा मोठा भाऊ ठरला आहे. तरदुसरीकडे महाविकास आघाडीला 50 जागांवर समाधान मानावं लागलंय. यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला. पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी लागला आहे. कसा लागला हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. पण तरीही जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिकपणे आघाडीला मतदान केलं, त्यांचे आभार मानतो. जणू काही लाटेपेक्षा त्सुनामीच आली असं दिसतं. सर्व सामान्य जनतेला पटला की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
‘हा टोमणा नाही आता तरी अस्सल भाजपचा कोणी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही खूप प्रामाणिकपणे वागलो हे चुकलं आहे, असं वाटतंय. हा निकाल पाहिला तर मी ज्या काही प्रचार सभा घेतल्या. राज्यभर आम्ही फिरलो. हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मते का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का. कापसाला भाव नाही म्हणून दिली का? राज्यातील उद्योग गुजरातला नेले जात आहे त्यासाठी दिले का. महिलेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली त्यासाठी मते दिली का. कळत नाही,. प्रेमापोटी नाही पण रागापोटी अशी ही लाट जणूकाही उसळली हे कळत नाही. हा निकाल अनाकलनीय आहे. यामागचं गुपित काही दिवसात शोधावं लागणार आहे.’
एवढंच नाही तर त्यांनी जाहिरनाम्यात दिलेले आश्वासन लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमुक्त हे त्यांना करावं लागेल. नाही तर महाराष्ट्रातील जनतेला वाटेल की, हे निवडणुकीपूर्ती घोषणा होत्या. शिवाय कोरोना काळात कुटुंबियांचा प्रमुख म्हणून माझं ऐकणारा महाराष्ट्र माझ्याशी असं वागेल यावर माझा विश्वास नाहीय. नक्कीच काहीतरी गडबड आहे. चार महिन्यापूर्वी लोकसभेचा लागलेला निकाल असा बदलू कसा शकतो. या सरकारने असे कोणते दिवे लावले ते पाहावे लागणार आहे?’
तूर्त मी महाराष्ट्रातील जनतेला सांगतो निराश होऊ नका. खचून जाऊ नका. काही लोकांचं म्हणणं आहे हा ईव्हीएमचा विजय आहे. असूही शकतो. पण जनतेला निकाल मान्य असेल तर कुणालाच काही बोलण्याची गरज नाही. पण मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहू. मी वचन देतो आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.