
काय होणार? कोण जिंकणार? ठासून येणार का घासून येणार ? अपक्ष किंग मेकर ठरणार ? अशा असंख्य प्रश्नांचे मोहोळ शनिवारी दुपारपर्यंत शांत झाले. एक-दोन एक्झिट पोल वगळता सगळ्या एक्झिट पोलनी महायुतीच महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येईल असे अंदाज वर्तवले होते.
मात्र तरीही महायुतीच्या गोटात धाकधूक होतीच. महायुती स्पष्ट बहुमतासह सत्तेत विराजमान होत असल्याचे दिसल्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार या तिघांनी मतदारांचे आभार मानले आणि विरोधकांना चिमटेही काढले.
विरोधकांवर टीका
महाराष्ट्रात मिळालेल्या विजयानंतर विरोधक सत्ताधारी महायुतीवर टीका करू लागले. विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी विरोधकांवर बोचरी टीका केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. लोकसभा निवडणुकाही ईव्हीएमवरच घेतल्याची आठवण करून देत अजित पवार म्हणाले की, “मग लोकसभा निवडणुकाही बॅलेट पेपरवर घ्यायला हव्या होत्या. लोकसभेचा निकाल बाजूने लागला की तो बरोबर आणि इथला निकाल विरोधात लागला तर म्हणतात की ईव्हीएम बरोबर नाही.” अजित पवार यांनी निवडणुकीत मिळालेलं यश हे अभूतपूर्व असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, “इतकं प्रचंड यश मिळालेलं माझ्या पाहण्यात नाही,बहिणींनी असा काही अंडरकरंट दाखवला की सगळे उताणे पडले.”
अजित पवार पुन्हा अर्थमंत्री ?
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून ते अर्थमंत्रीही आहेत. अर्थमंत्री म्हणून आपण लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक तजवीज केल्याचे अजित पवार यांनी अनेकदा सांगितले आहे. शनिवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी म्हटले की, “जसे जसे आकडे दिसत होते तसतशा फायनान्सच्या गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या. देवेंद्र यांना फोन केला आणि सांगितले की खूप काम करावे लागेल. एकनाथ शिंदे यांनाही फोन केला आणि त्यांना म्हटले की आर्थिक शिस्त आणावी लागेल. ” त्यांच्या विधानातून अजित पवार हेच पुन्हा अर्थमंत्री होणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. फायनान्सच्या गोष्टींसाठी पहिले फोन देवेंद्र फडणवीसांना केल्याचे सांगत अजित पवारांनी भविष्यातील मुख्यमंत्री तेच आहेत याचेही संकेत दिले.