
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी गटनेते पदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लावली.
तर, दुसरीकडे आता, निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या 20 आमदारांपैकी काही आमदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीआधीच ठाकरेंच्या 3 आमदारांना शिंदे गटाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केला.
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबईतील ताज अॅण्ड लँड्समध्ये पार पडत आहे. सत्ता स्थापनेपर्यंत सगळे आमदार मुंबईतच असण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला.
भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट…
भरत गोगावले यांनी शिवसेना ठाकरे गटाला निवडणूक निकालावरून टोला लगावला. ठाकरेंचे काही आमदार आमच्याकडे येणार असल्याचेही त्यांनी म्हटले. निवडणुकीआधीच आम्ही तीन जणांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी ऑफर नाकारली असल्याचे गोगावले यांनी म्हटले.
कोणत्या तीन आमदारांना ऑफर
भरत गोगावले यांनी म्हटले की, ठाकरेंना सोडून ही निवडणूक आमच्याकडून लढवावी यासाठीची ऑफर दिली होती. यामध्ये राजन साळवी, वैभव नाईक आणि शंकरराव गडाख यांना ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी ऑफर नाकारली. हे तिघेही ठाकरेंसोबत राहिले आणि पराभव झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
राजन साळवी हे राजापूरमधून, वैभव नाईक हे कुडाळमधून आणि शंकरराव गडाख हे नेवासामधून निवडणुकीच्या रिंगणात होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राजन साळवी, वैभव नाईक यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. साळवी आणि नाईक यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्यावरून तपास यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागले होते. तर, मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या गडाख यांनी यंदा शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली.
निवडणुकीत शिंदेंची सरशी, ठाकरेंना धक्का…
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणुकीत चांगलीच लढत झाली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी आपली जादू दाखवत 57 जागा निवडून आणल्या. तर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 20 जागांवर समाधान मानावे लागले. उद्धव यांचे बहुतांशी आमदार मुंबईतून निवडून आले. तर, शिंदे यांचे आमदार मुंबई महानगर क्षेत्र, मराठवाडा आणि इतर भागातून निवडून आले.