
मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही आहेत. तर इकडं एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी दोन्ही बाजूनं दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे. तसेच अपक्षांना आपल्या गोटात घेऊन पाठीराख्या आमदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेकडून केला जात आहे. आजच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांचा ताफा वर्षा बंगल्याजवळ दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्रीपदवरुन तिढा सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचा नवीन मुख्यमंत्री आता दिल्लीत ठरणार आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून आपल्या बाजूने अधिकाधिक अपक्ष ओढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे राजकारणात कोणत्याही शक्यता नाकारल्या जात नाही.
मिलिंद नार्वेकरांचा ताफा वर्षा बंगल्याजवळ…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थाना बाहेरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या कारचा ताफा गेल्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सक्रीय झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, किंवा त्यांच्या निकटवर्तीयांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली.
मिलिंद नार्वेकरांचा ताफा का दिसला?
मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा त्यांच्या कोणत्याही निकटवर्तीयाची भेट घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद नार्वेकर हे एस्सार ग्रूपचे अध्यक्ष शशिंकात रुईया यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी आले होते, अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थाना बाहेरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या कारचा ताफा गेल्यामुळे सर्वांची धावपळ उडाली होती. रुईया कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर हे खासदार अनिल देसाई यांचे बंधू सुनिल देसाई यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहचले.
भाजपला 5 अपक्षांचा पाठिंबा
भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्या आहेत. तसंच छोटे पक्ष, अपक्ष अशा 5 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि अशोक माने, युवा स्वाभीमानी पक्षाचे रवी राणा, अपक्ष शिवाजी पाटील यांचा समावेश आहे. या अपक्षांच्या पाठिंब्यामुळे विधानसभेत भाजपचं संख्याबळ 137 वर जावून पोहोचलं आहे आणि त्यामुळेचं भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नाव पुढे केलं जात आहे.