
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वातील महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या बहुमतानंतर राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
एका बाजूला महायुतीत खातेवाटपावर चर्चा सुरू होत आहे. तर, दुसरीकडे सरकारच्या शपथविधीसाठीची तयारी सुरू झाली आहे. महायुती सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडिअम, ब्रेबॉर्न स्टेडिअम, शिवाजी पार्क मैदान, आदी ठिकाणी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सरकार कितीही मजबूत असलं, बहुमत असलं तरी या मैदानावर शपथविधी पार पडलेलं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करत नाही.
मुंबई क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या आणि राजकीय स्थित्यंतरांचा साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी हा शापित ठरला आहे. आतापर्यंत या मैदानावर दोन सरकारचा शपथविधी पार पडला. पण, दुर्दैवाने या दोन्ही सरकारांना आपला कार्यकाळ पू्र्ण करता आला नाही. हा विचित्र योगायोग या मैदानाशी जोडला गेला आहे. 1995, 2019 मध्ये सरकारचा शपथविधी पार पडला होता. आता, पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर शपथविधी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. असे झाल्यास या तिन्ही सरकारमध्ये शिवसेना हा समान घटक असणार आहे.
युती सरकारचा शपथविधी…
1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले. शिवसेना-भाजपकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. मात्र, अपक्षांच्या मदतीने पहिल्यांदाच युती सरकार सत्तेवर आले. मनोहर जोशी हे या सरकारचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर मनोहर जोशी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मनोहर जोशी यांच्या ऐवजी नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले. युती सरकारने आपली मुदत पूर्ण होण्याआधीच मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे पुरेसं संख्याबळ असूनही युती सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यानंतर युती सरकार सलग दोन टर्म सत्तेतून बाहेर होते.
महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी…
शिवाजी पार्क मैदानावर महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे परस्पर वैचारिक राजकीय विरोधक एकत्र आले आणि मविआ स्थापन झाली. या मविआचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. ठाकरे घराण्यातील व्यक्तीने थेट मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने अनेकांना धक्का बसला. मात्र, अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर मविआचे सरकार कोसळले.