
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटला तरी महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलेलं नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत गुरुवारी रात्री महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची यानंतर मुंबईत बैठक होणार होती. पण नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळगावी गेले आहेत. यामुळे महायुतीची बैठक रद्द करावी लागली. एकनाथ शिंदे यांनी जरी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली असली तरी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडलेला नाही. यातच आता मुख्यमंत्रिपदाबाबत वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
एकनाथ शिंदे गावी, मोठा निर्णय घेणार…
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना ऐनवेळी एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या त्यांच्या मूळगावी गेले आहेत. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं की, जेव्हा एकनाथ शिंदेंना वाटतं की त्यांना विचार करण्यासाठी वेळ हवाय तेव्हा ते गावी जातात. एकनाथ शिंदे जेव्हा मोठा निर्णय घेणार असतात तेव्हा ते गावी जातात. येत्या २४ तासात ते मोठा निर्णय घेतील.
महायुतीची बैठक रद्द…
एकनाथ शिंदे ऐनवेळी गावी गेल्यानं महायुतीची बैठक रद्द करावी लागलीय. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मुंबईत महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार होती. या बैठकीत सरकारस्थापनेत अडचणीच्या ठरणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार होती. पण आता ही बैठक लांबणीवर पडल्यानं अचडणी निर्माण झाल्या आहेत.
मोहोळ यांच्या नावाची चर्चा…
एका बाजूला मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाची चर्चा रंगली आहे. मोहोळ यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यानं या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण देताना या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला पाठिंबा…
राष्ट्रवादी काँग्रेसकडून याआधीच भाजपचा मुख्यमंत्री झाल्यास आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, राष्ट्रवादी त्यांच्या आधीच्याच खात्यांसाठी आग्रही आहे. अर्थखात्यासह इतर काही मंत्रालयांची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आलीय. याशिवाय इतर काही अडचण नसल्याचं अजित पवार यांनी अमित शहांसोबतच्या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार...
एकनाथ शिंदे हे जेव्हा कोणताही राजकीय पेच निर्माण होतो तेव्हा विचार करण्यासाठी गावी जातात असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं.दरे या गावी मोबाईलला नेटवर्क नाही. तिथं कोणाशीही संपर्क साधता येत नाही यामुळे ते शांतपणे विचार करू शकतात. तिथून ते मोठा निर्णय़ घेऊन परततात. शनिवारी सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय जाहीर करू शकतात असंही शिरसाट यांनी म्हटलंय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
वेगळं काही घडलं तर तयारी हवी – शिवसेना
शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनीही महायुती आणि शिवसेनेबाबत मोठं विधान केलंय. आम्ही महायुतीत आहोत पण वेगळं काही झालं तर आपली तयारी असायला हवी. महायुतीत वेगळं असावं असं कुणालाच वाटत नाही. त्यामुळे आम्ही आमची पूर्ण तयारी ठेवलीय. फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खातं होतं, त्याप्रमाणे आम्हाला ते पद आता मिळावं अशी आमची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिंदे गटाकडून गृह खात्याशिवाय इतर खात्यांवर दावा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी अमित शहांसोबतच्या बैठकीत गृह खात्याशिवाय इतर खात्यांवरही दावा केला आहे. यात भाजपकडे असणाऱ्या काही खात्यांचाही समावेश आहे. भाजपकडे तेव्हा उपमुख्यमंत्रिपद असताना इतर महत्त्वाची खाती दिली होती. आता आमच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आल्यास त्यांच्याकडची खातीही मिळायला हवीत अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून होतेय. शिंदे गटाने १२ तर अजित पवार यांनी ९ मंत्रिपदं मागितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय
शपथविधीला तारीख पे तारीख…
गेल्या चार दिवसांपासून शपथविधी २ डिसेंबरला होणार अशी चर्चा रंगली आहे.शिंदे गावी गेल्यानं महायुतीची बैठकही पुढे ढकलावी लागली. त्यातच शिंदेंच्या जवळच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे हे पुढच्या २४ तासात मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केल्यानं महायुतीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महायुतीच्या सरकारचा शपथविधी आता ५ डिसेंबर रोजी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.