
विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकून आल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली. यानंतर आज राज्यपालांकडे जात महायुतीच्या नेत्यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला.
यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यात अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची चांगलीच फिरकी घेतली तर शिंदेंच्या टिप्पणी नंतरही एकच हशा पिकला. तर एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहतील की नाही ? याबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याचवेळी अजित पवार यांनी अमित शाह यांच्या भेटीवर महत्वाचे भाष्य केले.
एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळात राहतील की नाही ? याबाबत विचारले असता, सायंकाळी पर्यंत याबाबत कळवतो असे उत्तर दिले. त्याचवेळी त्यांचं माहिती नाही पण मी उद्या शपथ घेणार अशा अजितदादांच्या कोटीने त्याठिकाणी खसखस पिकली. तर अजितदादांना पहाटे आणि सायंकाळी शपथ घेण्याचा अनुभव आहे. असे म्हणत शिंदेंनीची टिप्पणी एकच गाजली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, मी एक खुलासा करू इच्छितो, मी माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. मी कुणालाही भेटायला गेलो नव्हतो. मी अमित शाह यांना भेटायलाच गेलो नव्हतो, तर भेट नाकारायचा प्रश्नच येत नाही. सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्य म्हणून ११ जनपथ हा बंगला देण्यात आला आहे. त्या बंगल्यावर काय बदल करता येतील, हे बघण्यासाठी आर्किटेक्टला घेऊन गेलो होतो. शिवाय सर्वोच्च न्यायालयात आमच्या खटल्याचं काम पाहणाऱ्या वकिलांना भेटणं आणि एका जवळच्या नातेवाईकाचं लग्न अशा तीन गोष्टींसाठी प्रामुख्याने मी दिल्लीला गेलो होतो. असेही ते म्हणाले.
दरम्यान, उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. त्यासाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. यातच एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही ? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. तर एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.