
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेस जबाबदार असणाऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे यासाठी पहिल्या दिवसापासून औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे सरकारकडे मागणी करीत आहेत..
या बाबत कांही दिवसांपूर्वी बीड येथे निघालेल्या आक्रोश मोर्चात त्यांनी सहभाग नोंदवत आपल्या संतप्त भावना व्यासपीठावरून व्यक्त करीत मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फासावर लटकवण्याची मागणी केली. यावरही न थांबता आमदार पवारांनी परवा थेट मुंबई गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या घटनेचे गांभीर्य आणि देशमुख कुटुंबाची अवस्था सांगितली. आणि यावर कडक ऍक्शन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्याकडे केली होती.
यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच यातील दोषींना अटक करून त्यांना कडक शासन करण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. या घटनेने अस्वस्थ झालेल्या आमदार अभिमन्यू पवारांना देशमुख कुटुंबाची झालेली अवस्था स्वस्थ बसू देत नव्हती. यासाठी त्यांनी देशमुख कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी मतदारसंघातील लोकांना मदत देण्याचे आवाहन केले आहे.
मस्सा जोग जी. बीड या घटनेवर सत्ताधारी पक्षात असूनही सरकारला प्रश्न विचारत या घटनेत सहभागी असलेल्याना तात्काळ अटक करून त्यांना फासावर लटकवण्याची मागणी औशाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवारांनी लावून धरली आहे. या विरोधात विधानसभेतही त्यांनी आवाज उठविला होता. बीड येथील आक्रोश मोर्चात सहभागी होऊन त्यांनी पोटतिडकीने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.
ज्या पद्धतीने स्व. संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली ती माणुसकीला काळिमा फासणारी होती. ही माणुसकीची हत्या आहे त्यामुळे या घटनेत जे कुणी सहभागी असतील मग ते कोणत्याही पक्षाचे, जाती धर्माचे असोत त्यांना फासावर लटकवण्याची मागणी त्यांनी केली होती. हीच मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीतही केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी स्वतः एक्कावन्न हजार रुपये देण्याची घोषणा केली असून औसा मतदारसंघात ते मदत गोळा करण्यासाठी फिरणार आहेत.
ज्याला जशी जमेल तशी मदत करावी असे आवाहन त्यांनी मतदारसंघातील जनतेला आणि भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. आजपासून परवा पर्यंत (बुधवार ते शुक्रवार) ते औसा ते तुळजापूर पायी नवसपूर्ती पदयात्रेत आहेत.
ही पदयात्रा संपल्यावर औसा तालुक्यातील आणि निलंगा तालुक्यातील गावात जाऊन मदत संकलित करणार आहेत. खरे तर बीड जिल्हा किंवा मस्सा जोग हे कांही आमदार पवारांचे कार्यक्षेत्र नाही मात्र केवळ माणुसकीच्या नात्याने त्यांनी उचलेल्या या पावलांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.