
CID चा वर्मावर घाव, दोन्ही भावांसाठी ‘हाजीर हो’
आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण करून केज न्यायालयाने त्याला सीआयडी कोठडी सुनावली तरीही सहआरोपी सुदर्शन घुले पोलिसांना शरण येत नसल्याने सीआयडी त्रस्त आहे.
त्यामुळे सीआयडीने थेट घुले याच्या वर्मावरच घाव घातला आहे. सुदर्शनच्या मागावर सीआयडीची ९ पथके आहेत. कराड ताब्यात आल्यानंतर सीआयडीचे पुढचे लक्ष्य आता घुले असणार आहे.
वाल्मिक कराडचा शोध लागत नसल्याने सीआयडीच्या कार्यप्रणालीवर मोठी टीका होत होती. मंगळवारी दुपारी वाल्मिकने शरण येऊन सीआयडीची आणि संपूर्ण व्यवस्थेची अब्रू काढली. खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी असे गंभीर गुन्हे असल्याने वाल्मिकसह त्याच्या अन्य साथीदारांची चौकशी होणे गरजेचे आहे. वाल्मिकने उशीरा का होईना पण आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला परंतु सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे आरोपी अद्याप फरार आहेत.
निकटवर्तीयांची चौकशी करून आरोपींना दणका देण्याचे प्रयत्न
फरार आरोपींना दणका देण्यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्याचे पाऊल सीआयडीने उचलले आहेत. बुधवारी बीड सीआयडीचे डीवायएसपी यांनी आरोपी सुदर्शन घुले याच्या दोन्ही भावांना चौकशीसाठी पाचारण केले. सुदर्शन घुले काय काम करतो? पैसे कमाविण्याचे त्याचे साधन काय? वाल्मिक कराडची आणि त्याची ओळख कशी? असे प्रश्न सीआयडीने सुदर्शन घुले याच्या दोन्ही भावांना विचारल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुदर्शन घुले याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
सीआयडीची पथके सुदर्शनच्या मागावर असली तरी सुदर्शन अजूनही त्यांच्या हाताला लागलेला नाही. बुधवारी दोन्ही भावांची चौकशी करून एकप्रकारे सीआयडीने सुदर्शन घुले याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून आत्मसमर्पण करण्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला. पोलिसांसमोर हजर झाला नाही तर निकटवर्तीयांना पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावून सुदर्शनचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सीआयडीचा प्रयत्न असेल, जेणेकरून सुदर्शन लवकरात लवकर शरण येईल.
फरार आरोपींना पकडण्यासाठी जनमाणसांचा रेटा, तपासाचा वेग अधिक गतिमान करण्याची गरज
एकीकडे देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यासाठी जनमाणसांचा रेटा असल्याने सीआयडीवर मोठा दबाव आहे. राज्यातल्या विरोधकांसह सत्ताधारीही तेवढेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सीआयडीला तपासाचा वेग अधिक गतिमान करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.