
विखे-पाटलांचं सूचक वक्तव्य
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपास वेगाने केला जात आहे. एकीकडे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा होत आहे, त्यातच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.
त्यामुळे आता चर्चांना उधान आले आहे.
राज्यात गाजलेले मस्साजोग प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव आले. तर दुसरीकडे कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे साहाजिकच धनंजय मुंडेंवर विरोधक आरोप करत आहेत. तर दुसरीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडी आणि विशेष तपास पथक कसोशीने करत आहेत. या प्रकरणात संबंधितांची चौकशीही केली जात आहे.
वाल्मिक कराड चर्चेत
वाल्मिक कराड यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा राज्यात आहे. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल नसला तरी तेच याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वाल्मिक कराड हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी अनेक वर्षे धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन केले आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच धनंजय मुंडेंचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
विरोधकांचा राजीनाम्यावर जोर
विरोधक राजीनाम्याची मागणी करत असतानाच आता भाजप आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. सरपंच हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतरच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असं विखे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे खरंच राजीनामा देणार आहेत का हे अजून गुलदस्त्यातच आहे.
पंढरपूरमध्ये काय म्हणाले विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना भाष्य केले. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करुन आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात धनंजय मुंडे हे राजीनामा देऊ शकतात अशी शक्यता आहे.